महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये सामील होतील, मंत्री दादा भुसे यांचा दावा
धुळे : निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे महाविकास आघाडीत मोठे इश्यू होतील, वाद उफाळून येतील, फाटाफूट झालेली दिसेल आणि त्यांच्यातील अनेक लोकं महायुतीमध्ये येतील, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आणली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त (9 Feb) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतिष महाले यांनी गुरुवारी धुळ्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात दीड हजारांहून अधिक दात्यांनी रक्तदान केल्याचा दावा आयोजकांनी केला. रक्तदात्यांना स्मार्टवाॅच आणि मोबाईल इअरबर्ड भेट देण्यात आले.
या कार्यक्रमात ना. दादा भुसे म्हणाले की, रक्तदान हे महानदान आहे. रक्तदानातून रुग्णाचे प्राण वाचत असतील तर त्यापेक्षा पुण्याचे मोठे काम नाही. पंन्नास -शंभर जणांनी रक्तदान केले तर ते मोठे रक्तदान शिबिर मानले जाते. परंतु येथे रक्तदानासाठी नंबर लागले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विक्रम मोडणारे हे रक्तदान शिबिर असेल असे ना.भुसे म्हणाले. शिवसेना प्रमुखांचे ८० टक्के समाजकारणाचा वसा पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. वर्षभरात राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे हे २० ते २२ तास काम करायचे. तोच वसा आणि वारसा मुख्यमंत्री शिंदे हे चालवत आहेत. भेटायला आलेल्या शेवटच्या माणसासाठी भेटेपर्यंत मुख्यमंत्री झोपत नाही. या आधी वर्षावर मर्यादीत प्रवेश होता, असा टोला नाव न घेता ना. भुसेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षा निवासस्थान सर्वांसाठी खुले झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्य माणसालाही सहज भेटतात.
मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्याचे काम रक्तदानाच्या महायज्ञातुन सतीश महालेंनी केले आहे. त्यासाठी मी महालेेंना शुभेच्छा देतो. रक्तदात्यांनी देखील पवित्र कार्य केले आहे. निष्काम भावनेतून आपण कार्य केले तर परमेश्वर देखील आपली दखल घेतो. शिवसैनिकांनी आपले कर्तव्य निष्काम भावनेतून केले तर तो मंत्री आणि मुख्यमंत्री देखील होवू शकतो हेच दिसून आले आहे. धुळे जिल्हा शिवसेनेचे आणि मुख्यमंत्र्यांचे काम जनहिताचे असल्यामुळेच रक्तदान शिबिराला हा प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज नाशिक दौर्यावर असून त्या दौर्यात सतीश महालेंच्या रक्तदान महायज्ञाची माहिती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचेही ना. दादा भुसे म्हणाले.
रक्तदानासाठी जीवनज्योती ब्लड बँक ,नवजीवन बल्ड बँक आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालय देखील मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावीत, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे लोकसभा समन्वयक प्रसाद डोमसे, शहर प्रमुख सनी गुजराथी, पंकज मराठे, राजू चौधरी, माजाी महापौर कल्पना महालेे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश गाळणकर, जगदीश देवपूरकर यांनी केले तर आभार सतीश महाले यांनी मानले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटलांचा सत्कार : धुळे शहरातील क्युमाईन क्लबजवळ शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.दादा भुसे यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष मनोज ेगर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांचा सत्कार केला.