बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश
धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेले विनोद वाईन्स हे दारू दुकान दहा दिवस बंद करून, हे वादग्रस्त दुकान त्वरीत स्थलांतरित करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी दिले.
धुळे शहराचे आमदार डॉ. फारूख शाह यांच्या प्रयत्नांमुळे विनोद वाईन्स प्रकरणी गुरुवारी मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला आमदार फारुख शाह उपस्थित होते. तर धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि उपोषणकर्ते व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून लढा : धुळे शहरात बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारी असलेले दारू दुकान हटविण्यासाठी आंबेडकरी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून तरुणांच्या एकजुटीने या लढ्याला चालना मिळाली. ‘विनोद वाईन शाॅप हटाओ’ नावाचा व्हाट्सॲप ग्रुपही तयार झाला. विविध पक्ष- संघटनांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, आंदोलनेही झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून आझाद समाज पार्टीने या मागणीला जोर दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात दारू दुकानाचा बोर्ड फोडला गेला आणि या मागणीची तीव्रता वाढली. 1 फेब्रुवारीपासून आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विविध पक्ष-संघटनांसह आमदार फारुख शाह यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच गुरुवारी मंत्रालयात निर्णायक बैठक झाली.
उपोषण मागे घेण्याच्या निर्णयासाठी आज बैठक : मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकत्र्यांची भेट घेतली. मंत्रालयात झालेल्या निर्णयानुसार लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु संपूर्ण समाजाशी चर्चा केल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, अशी भूमिका उपोषणकत्र्यांनी घेतली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता धुळे शहरात क्युमाईन क्लब रस्त्यावर उपोषण स्थळी बैठक होणार आहे.
गुलमोहर विश्रामगृहातही बैठक : बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिल्यानंतर याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सकाळी 9 वाजता समाजबांधवांची बैठक होणार आहे. तसा संदेश विनोद वाईन शॉप हटाओ या ग्रुपवर दिला आहे.
आमदार कार्यालयाने दिलेली माहिती अशी : आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. ३ फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी आ. फारुख शाह यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले होते.
त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्र. ३०२, मुख्य इमारत, ३ रा मजला येथे बैठक झाली. या बैठकीस आ. फारुख शाह, जिल्हाधिकारी धुळे,(व्हिडिओ कॉन्फरन्सिंग), पोलीस अधिक्षक, (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग), मुकुंदराव शिरसाठ, ॲड. सुमित साबळे, जितेंद्र निकाळजे, कैलास जैस्वार आणि उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे हे धुळे येथील उपोषण स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत विनोद वाईन्स संदर्भात चर्चा करण्यात येवून आ. फारुख शाह यांनी धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. तर उपोषणकर्ते आनंद लोंढे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठल्याही शासननिर्णयापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य मोठे आहे. त्यामुळे शासनाने हे दुकान हटविलेच पाहिजे, असे मत मांडले. बैठकीत सहभागी सर्वांचे म्हणणे ऐकून मद्यविक्री दुकान १० दिवसांकरिता बंद ठेवण्यात यावे आणि आणि दि. ९ रोजी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्यविक्री दुकान स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश ना. शंभूराज देसाई यांनी दिले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेले मद्यविक्री दुकान त्याठीकाणाहून हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबैठकीत धुळे येथील उपोषणस्थळावरून संतोष अमृतसागर, भैय्यासाहेब वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, चिंतामण थोरात, मुकेश वाघ, जितेंद्र शिरसाठ, राज चव्हाण, आनंद सैंदाणे, मुकेश खरात, आसिफ शाह, संजय अहिरे, विनोद केदार, डॉ. शरद भामरे, अरविंद निकम, दिनेश निकूंभे आदी सहभागी झाले होते. विनोद वाईन्स हटविण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेने आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा