ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने
धुळे : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रसृष्टीला राज्य घटनेने स्वातंत्र्य दिले आहे. जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचा अधिकार घटनेनेच पत्रकारांना दिला आहे. परंतु दहशत माजवून, हल्ला करुन पत्रकारांच्या अधिकारांवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शासनाने अशा हल्लेखोर आणि दहशत निर्माण करणार्या प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी केली.
पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भ्याड हल्ला झाला. त्या निषेधार्थ शनिवारी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात संपूर्ण पत्रसृष्टी एकवटली. मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनही देण्यात आले. पत्रकारांच्या या मागणीला समविचारी संघटनांनीही पाठबळ दिले.
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीच्या चौथ्या खांबाला दिले आहे. पत्रकार हे पारदर्शक पध्दतीने जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचे काम करतात परंतु दहशत,हल्ले करुन पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम सध्या सुरु आहे. पत्रकारांचे लिखान, बोलणे यावर दहशतीच्या माध्यमातून निर्बंध घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. वास्तविक पाहता पत्रकार, धर्म, राजकारण बाजूला ठेवून वस्तुस्थिती समोर मांडत असतो. मुजोर सत्ताधार्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्तेतून खाली खेचू शकतो हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. पत्रकारांवर होणारे प्राणघातक हल्ले पत्रसृष्टी खपवून घेणार नाही. धुळे जिल्ह्याची पत्रकारीता ही घाबरणारी नाही,त्यामुळे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होवू नये. पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी महेश घुगेंनी केली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्याच्या डेक्कन येथील खंडूजी बाबा चौकात शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. निर्भय बनो कार्यक्रमस्थळी दगडफेक देखील करण्यात आली. लाठी हल्ला, शाई फेक, अंडी फेक केली. निखिल वागळे यांच्यावर ४ ते ५ ठिकाणी जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. विचारांची लढाई, विचारांनीच लढली पाहिजे. गुंडशाहीने व्यक्ती मारता येतो. मात्र विचार मारता येत नाही. म्हणून कायदा हातात घेणार्यांना तो कोणत्याही पक्ष संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता अथवा समर्थक असो, त्याला कडक शासन झालेच पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड झाल्याचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने निषेध करतो.
निवेदन देतेेवेळी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रविंद्र इंगळे, सुनिल पाटील, नूरखान पठाण, व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार, ईटीव्ही भारतचे रिपोर्टर आणि नंबर वन महाराष्ट्रचे संपादक सुनील बैसाणे, तुषार बाफना, सचिव सचिन बागुल, प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाठ, सदस्य मोहन मोरे, रविंद्र नगराळे, पुरुषोत्तम गरुड, झी-२४ तासचे प्रशांत परदेशी, एबीपी माझाचे धनंजय दिक्षीत, सिध्दार्थ पारेराव, सुभाष वाघ, विरेंद्र मोरे, तुषार परदेशी, अजय गर्दे, आकाश सोनवणे, दिनेश निकुंभ, चंदू पाटील, गोरख गर्दे, संजय पाटील, आवेश खान, पंकज पाटील, दीपक शिंदे, दिलीप मोहिते, राम निकुंभ, मनोहर सोलंकी, योगेश पाटील, राकेश गाळणकर, दिग्वीजय गाळणकर आदी उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या या मागणीला समविचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी पाठबळ दिले. यावेळी अंनिसचे अविनाश पाटील, शिवसेनेचे डॉ. सुशिल महाजन, किरण जोंधळे, अॅड.जगदीश सूर्यवंशी, अॅड. राहुल वाघ, डॉ. अनिल भामरे, अॅड. संतोष जाधव, योगेश जगताप, राष्ट्रवादीचे रणजीत भोसले, आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे, राजेंद्र डोमाळे, सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, मनोज जाधव, महादू गवळी, कुणाल कानकाटे, ललीत माळी, दीपक देवरे आदी उपस्थित होते.