कढीपत्ता खा अन् शुगरसह वजनही घटवा !
आपल्या घराच्या समोर नेहमीच कढीपत्त्याचे झाड लावलेलं असतं. विशेषता याचे गुणधर्म माहीत नसल्याने या झाडाकडे विशेष कुणाचं लक्ष नसतं. परंतु पोषक मूल्याने भरगच्च भरलेलं हे झाड आपली शुगर कमी तर करेलच वजनही नियंत्रणात ठेवू शकतं. आहे की नाही सोपा उपाय. चला तर जाणून घेऊ कडीपत्त्याचे फायदे. कढीपत्ता कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवतो. टाईप टू मधुमेहावर नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे. केसांसाठी उत्तम असून त्वचेसाठी देखील कढीपत्ता गुणकारी आहे.
रोज सकाळी कढीपत्त्याची पाच ताजी पाने खाल्ल्याने वजनात घट होते, पोटफुगी, ऍसिडिटी, अपचन यावरही चमत्कारिक रित्या नियंत्रण मिळवता येते. कढीपत्त्यातील पानांमध्ये प्रथिने, फायबर,कॅल्शियम, फॉस्फरस,लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. विटामिन ए ,बी,सी आदी जीवनसत्वे पानांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. दक्षिण भारतात सांबार चटणी, आमटी आणि रसम यासाठी कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरतात कढीपत्त्याचा वापर दक्षिण भारतात मसाला म्हणून देखील करतात. हिरवा पाला सावलीमध्ये सुकून पावडर तयार केल्यास आहारात सातत्याने वापरता येईल,आपण जेवणातून पाने बाजूला काढून टाकतो, यावर हा नामी उपाय ठरू शकेल. फोडणी देताना बऱ्याचदा कढीपत्ता जळून जातो त्यामुळे त्यातील गुणधर्म नष्ट होतात. शक्यतो मसाल्यासोबत वाटून कढीपत्त्याचा वापर केल्यास अलगदपणे कढीपत्ता आपल्या आहारात समावेश करेल. स्वाद आणि औषध या दोन्हींचा संगम असणारी ही पाने आपल्या आहारात नियमितपणे अवश्य ठेवण्याचा प्रयत्न करा…