चिंचवारची पाणी टंचाई दूर करण्यासाठी चिरक्यावड धरण भरण्याची मागणी
धुळे : तालुक्यातील चिंचवार येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा डावा कालव्याचे पाणी नाथरीपाडाजवळील चिरक्यावड धरणात सोडण्यात यावे अशी मागणी चिंचवार ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे केली.
चिंचवार गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी धुळे निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, चिंचवार ता.धुळे येथे आतापासूनच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावाची नळ पाणी पुरवठा योजना नाथरीपाडाजवळीलचिरक्यावड धरणाच्या पायथ्याशी आहे. मात्र दुष्काळामुळे हे धरण कोरडेठाक पडले आहे. परिणामी न.पा.योजनेच्या विहीरीची पाण्याची पातळी खालवली असून गावासाठी पिण्याचा पाणीपुरवठा अपूर्ण पडत आहे. दरम्यान चिंचवार गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र कोणतेही पाण्याचे स्त्रोत नाहीत. त्यामुळे येथील माता बघिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच जनावरांनाही पाणी टंचाईची झळ बसली आहे. म्हणून अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात पाणी टाकल्यास न.पा.यो.च्या विहीरीची पाण्याची पातळी वाढून चिंचवार गावाची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होवू शकते. म्हणून अक्कलपाडा डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात टाकण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी माजी सरपंच सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य दाजभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य रहीम पटेल यांनी निवेदन दिले.