धुळ्याहून अयोध्येसाठी आस्था विशेष रेल्वे; यात्रेकरूंचे डॉ. भामरेंना भरभरून आशीर्वाद
धुळे : अयोध्येत तब्बल पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर साकारल्याननंतर भारतातील प्रत्येक श्रीरामभक्ताला अयोध्येतील मंदिराला भेट देऊन श्री रामलल्लांच्या दर्शनाची आस लागली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री संसदरत्न डॉ. सुभाष भामरे यांनी स्वखर्चाने लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य व बागलाण या सहाही विधानसभा मतदारसंघांतील सुमारे २००० भक्तांना अयोध्येतील श्रीराम लल्लाचे मोफत दर्शन घडविले.
यासाठी खासदार डॉ. भामरे यांनी श्रीराम भक्तांसाठी धुळे ते चाळीसगावदरम्यान विशेष मेमू ट्रेन तसेच चाळीसगाव ते अयोध्येपर्यंत व पुन्हा परतीच्या प्रवासासाठी अयोध्या ते चाळीसगाव अशी स्वतंत्र आस्था विशेष रेल्वेची तसेच चाळीसगाव ते धुळेदरम्यान मेमू ट्रेनची व्यवस्था करून दिली. अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्लांचे दर्शन घेत श्रीरामचरणी नतमस्तक झालेल्या सर्व दोन हजार भक्तांनी खासदार डॉ. भामरे यांनी मोफत प्रवासासह सलग तीन दिवस पाणी, चहा-नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करून दिल्याने त्यांना भरभरून आशीर्वादही दिले.
यात्रेकरूंच्या घोषणांनी वातावरण राममय : धुळे येथील रेल्वेस्थानकातून १६ फेब्रुवारीला रात्री एकला सर्व दोन हजार भक्तांना मेमू रेल्वेने चाळीसगावपर्यंत रवाना करण्यात आले. या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. येथून मार्गस्थ होताना सर्व रामभक्तांनी दिलेल्या सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी रेल्वेस्थानक दुमदुमून गेले होते. १७ फेब्रुवारीला सकाळी सहाला चाळीसगाव येथून सर्व रामभक्त स्वतंत्र अशा विशेष आस्था रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले. या प्रवासात भक्तांनी भजन, श्री रामरक्षा पठणासह विविध भक्तिगीते गात वातावरण श्रीराममय करून टाकले. रेल्वे प्रवासात सर्व यात्रेकरूंना खासदार डॉ. भामरे यांच्या सौजन्याने पिण्यासाठी पाणी, चहा, नाश्ता आदींची मोफत व्यवस्था करून देण्यात आली. तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही रेल्वेतच करून देण्यात आली.
अयोध्येत पाऊल ठेवताच रामभक्त भारावले : शनिवारी दिवसभर व रात्रभर प्रवास केल्यानंतर सर्व रामभक्त रविवारी (ता. १८) सकाळी दहाला अयोध्येत पोहोचले. श्रीराम जन्मभूमीत आपले पहिले पाऊल ठेवल्यानंतर सर्व रामभक्तांनी आपले जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. अयोध्या रेल्वेस्थानकातून सर्व भक्तांना सुमारे १०० बसने खासदार डॉ. भामरे यांच्यातर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे सर्व भक्तांनी स्नान आटोपले. तसेच सर्वांना दुपारचे जेवण देण्यात आले. यानंतर सर्व भक्तांना रामलल्लाच्या दर्शनासाठी नेण्यात आले. या सर्व भक्तांची खासदार डॉ. भामरे यांच्यातर्फे विशेष दर्शन व्यवस्थाही करण्यात आली होती. यामुळे रामलल्लाचे दर्शन घेतानाच त्याची मूर्ती डोळ्यांत साठविताना सर्व भक्त भारावून गेले. यावेळी सर्व भक्तांनी भावभक्तीने श्रीरामांचा एकच जयघोष करत मंदिर परिसर दणाणून सोडला. तसेच हे दर्शन घडविल्याबद्दल खासदार डॉ. भामरे यांना विशेष धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.
अयोध्येतील धार्मिक स्थळांना भेटी : रविवारी (ता. १८) दुपारी श्रीराम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व रामभक्तांना अयोध्येतील विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नेण्यात आले. सायंकाळी पुन्हा खासदार डॉ. भामरेंकडून सर्व भक्तांना भोजन देण्यात आले. तसेच निवास व्यवस्थेच्या ठिकाणी मुक्काम करण्यात आला. सोमवारी (ता. १९) सकाळी चहा-नाश्ता केल्यानंतर भक्तांनी पुन्हा धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
रामभक्तांचा अयोध्येहून परतीचा प्रवास : सोमवारी दुपारी जेवण केल्यानंतर आराम करून सायंकाळी पाचला सर्व भाविक विशेष बसने रेल्वेस्थानकात आले. तेथून विशेष आस्था रेल्वेने पुन्हा त्यांनी चाळीसगावकडे परतीचा प्रवास सुरू केला. या प्रवासात सर्व भक्तांची रात्री जेवणाची व्यवस्था रेल्वेतच करण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा त्यांना चहा-नाश्ता व दुपारचे जेवणही देण्यात आले. सायंकाळी सातला सर्व रामभक्त चाळीसगाव येथे पोहोचले.
डॉ. भामरेंकडून फुलांच्या वर्षावात स्वागत : श्रीराम लल्लाचे दर्शन घेऊन परतलेल्या सर्व दोन हजार रामभक्तांचे मंगळवारी (ता. २०) सायंकाळी स्वतः खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे चाळीसगाव येथील रेल्वेस्थानकात फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीराम नामाचा एकच जयघोष करण्यात आला. ज्यामुळे चाळीसगाव येथील रेल्वेस्थानक दणाणून गेले. खासदार डॉ. भामरे यांच्या या स्वागताने सर्व रामभक्त भारावले व त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घडविण्यासह संपूर्ण रेल्वे प्रवासात खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह त्यांचे स्वीय्य सहाय्यक व टीमने केलेल्या उत्तम व्यवस्थेसाठी धन्यवाद देत भरभरून आशीर्वादही दिले. एवढेच नव्हे तर श्रीराम भक्तांसोबत खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेनेच चाळीसगाव ते धुळे असा रेल्वेप्रवास करत श्रीराम भक्तांशी संवाद साधला. तसेच भाविकांसोबत श्रीराम नामाचा जयघोष करत विविध गीतांवर तालही धरला.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून धुळ्यात स्वागत : दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या धुळे जिल्हा व महानगर शाखेतर्फे धुळे येथील रेल्वेस्थानकात मंगळवारी रात्री नऊला खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अयोध्येहून परतलेल्या सर्व श्रीराम भक्तांचे श्रीराम नामाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई अहिराव, भाजपचे चेतन मंडोरे, यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, राजेंद्र खंडेलवाल, सागर कोडगीर, सुबोध पाटील, शरद चौधरी, हीना मेवानी, सिद्धेश पाटील, भूपेश बडगुजर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ५०० हून अधिक कार्यकर्त्यांतर्फे गुलाबाची फुले देत प्रत्येक श्रीराम भक्ताचे स्वागत करण्यात आले. यावेळी डीचे व ढोल-ताशांच्या गजरात श्रीराम भक्तांसह खासदार डॉ. सुभाष भामरे तसेच भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांनी नृत्याचा ठेकाही धरला. उत्साही श्रीरामभक्तांनी तर खासदार डॉ. भामरे यांना खांद्यावर उचलून धरत प्रभू श्रीरामासह त्यांचाही जयजयकार केला.
संपूर्ण प्रवासात रेल्वेसह श्रीराम भक्तांना पोलिस संरक्षण : खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे सर्व दोन हजार श्रीरामभक्तांना श्रीरामलल्लांचे दर्शन घडविण्यात आले. या तीन दिवसांच्या संपूर्ण प्रवासात विशेष आस्था रेल्वेतील सर्व रामभक्तांना चोख पोलिस संरक्षणही पुरविण्यात आले. एवढेच नव्हे तर ही रेल्वे जेथे-जेथे थांबा घेत होती त्यावेळी रेल्वेभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक असलेल्या श्रीराम भक्तांची विशेष काळजी घेण्यात आली. खासदार डॉ. भामरे यांनी सर्व रामभक्तांच्या उत्तम व्यवस्थेसाठी सलग तीन दिवस आपल्या टीमशी सातत्याने संपर्कात राहून विविध सूचना दिल्या.
भाविक काय म्हणतात?
प्रवासासह सर्व व्यवस्था चोख
खगेंद्र माधवदास बुवा (अंतापूर, ता. बागलाण) : आमचे लोकप्रिय खासदार बाबासाहेब डॉ. सुभाष भामरे यांनी आम्हा भक्तांना अयोध्येत स्वखर्चाने प्रभू श्रीरामांचे दर्शन घडविले. त्यांनी आमच्या धुळे ते अयोध्या व तेथून पुन्हा धुळ्यापर्यंतच्या प्रवासासह चहा-नाश्ता, भोजन, निवास आदी व्यवस्था चोख ठेवली. अयोध्योत प्रभू श्रीरामलल्लांचे सुंदररीत्या दर्शन घडविले. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे व त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.
खासदार डॉ. भामरेंमुळे इच्छा फलद्रूप
सौ. मीनाक्षी बोरसे (धुळे) : धुळ्याहून अयोध्येपर्यंत व अयोध्येहून धुळ्यापर्यंतच्या प्रवासाची उत्तम व्यवस्था होती. अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारल्यानंतर श्रीरामलल्लांचे दर्शन घेण्याची मनस्वी इच्छा होती, ती आमचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे फलद्रूप झाली. संपूर्ण प्रवासात आम्हाला बिसलेरी पाणी, चहा-नाश्ता व दोन वेळचे उत्तम दर्जाचे जेवण मिळाले. अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताना आमच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले. आमची ही इच्छापूर्ती केल्यानिमित्त खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे शतशः आभार.
सर्व भक्तांची टीमने घेतली काळजी
तुषार भामरे (पिंपळकोठा, ता. बागलाण) : आमच्या लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार नेतृत्व खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची आमच्या मनातील सुप्त इच्छा आज पूर्ण झाली. खासदार डॉ. भामरे व त्यांच्या टीमने संपूर्ण प्रवासात आमची निवास, भोजन व दर्शनासाठी केलेली व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची होती. प्रत्येकाला काय हवे, काय नको, याची विचारपूस केली जात होती. संपूर्ण प्रवासात आम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज भासली नाही. या सर्व उपक्रमासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे शतशः आभार.
दैवी संधीसाठी डॉ. भामरेंचे आभार
रोहिणी चव्हाण (धुळे) : आम्ही आमच्या आयुष्यात कधी विचारही केला नव्हता, की आम्हाला अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन होईल. पण आमचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे आम्हाला ही दैवी संधी प्राप्त झाली आणि आमच्या आयुष्याचे सार्थक झाले. त्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना कोटी कोटी प्रणाम. संपूर्ण प्रवासात महिला भक्तांची टीमने अतिशय व्यवस्थित काळजी घेतल्याने आम्ही कुटुंबासोबतच प्रवासात करत असल्याचे जाणवले.