सातवे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन
धुळे : खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र,धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नेर (ता. धुळे) येथे आयोजित करण्यात येत आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी होणार्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ.कुणाल बाबा पाटील तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ.सुधीर देवरे यांची निवड करण्यात आली आहे. अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घघाटन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.भारत सासणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
अहिराणी साहित्याचा आणि संस्कृतीचा जागर व्हावा आणि अहिराणी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून खान्देशात आतापर्यंत सहा अहिराणी साहित्य संमेलने झाली आहेत. खान्देशासह महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अहिराणी साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या साहित्य संमेलनांना मिळाला आहे. त्या अनुषंगाने अहिराणी संमेलनाची परंपरा कायम ठेवत अहिराणी भाषा, व साहित्याच्या वृध्दीसाठी आ.कुणाल पाटील यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उत्तम पध्दतीने नियोजन करणार असल्याचे सांगितले आहे.
धुळे तालुक्यातील नेर येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरीत रविवार 25 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय 7 व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक डॉ. सुधीर देवरे, सटाणा हे राहणार आहेत. डॉ. सुधीर देवरे यांनी 28 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून विविध ग्रंथांचेही संपादन त्यांनी केले आहे. अहिराणी भाषा, कला, लोकजीवन व लोकवाडमयाचे ते अभ्यासक आहेत.लिखाणातील असंख्य पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते केले जाईल. विशेष अतिथी म्हणून 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत सासणे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. पुष्पराज गावंडे, व डॉ. धनंजय गुडसरकर, प्रसिध्द साहित्यिका मिनाक्षी पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
एक दिवसीय 7 व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सत्र, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, व चार सत्रामध्ये अहिराणी भाषेतील कवितांचे सादरीकरण होणार आहे. दिवसभर चालणार्या या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक तथा खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदशिव सुर्यवंशी, सचिव कवी रमेश बोरसे, प्राचार्या रत्नाताई पाटील, रमेश राठोड व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
अहिराणी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, कवी जगदिश देवपूरकर, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, प्राचार्या रत्नाताई पाटील, प्रा.रमेश राठोड, प्रा.अशोक शिंदे,शाहिर नानाभाऊ पाटील, गोकुळ पाटील, शरद धनगर, डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. कुणाल पवार, सौ. हेमलता पाटील, चुडामण पाटील, विजय पाटील, देवदत्त बोरसे, जितेंद्र चौधरी, प्रविण देवरे, सौ. सुनिता बोरसे, जितेंद्र बहारे, सुनिता पाटील, के. बी. लोहार, शाहिर श्रावण वाणी, विरेंद्र बेडसे, डॉ. भैय्या पाटील, बाळासाहेब गिरी, दिनेश चव्हाण, गणेश पाटील आदी परिश्रम घेत आहेत.