संवाद हीच भाषेची खरी ओळख : प्रा. डॉ. योगिता पाटील
धुळे : कोणतीही भाषा ही श्रेष्ठ, कनिष्ठ नसते. सर्वच भाषा आपापल्या पातळीवर चांगल्याच असतात. भाषेला प्रमाणसह कोणतीही मोजमापे लावणे अयोग्य आहे. जी कळते, जी समजते, जी जाणवते, जी शिकवते, कृतिशील बनवते व बोलण्यास प्रवृत्त करते ती भाषा असते. याच अंगाने विचार केल्यास संवाद हीच भाषेची खरी ओळख आहे असे प्रतिपादन झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागप्रमुख, लेखिका, वक्त्या प्रा. डॉ. योगिता आशुतोष पाटील यांनी केले. त्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपप्राचार्य विलास चव्हाण होते. तर वक्ते म्हणून नॅक कमिटीने बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून गौरविलेले प्रा. डॉ. घनश्याम थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
आपल्या अभ्यासपूर्ण व खास शैलीत संत व महापुरुष तसेच महनीय व्यक्तींच्या विचारांचे दाखले व विविध उदाहरणे देत प्रा. डॉ. योगिता आशुतोष पाटील यांनी ‘मराठी भाषेचे जीवनातील महत्व’ या विषयाची अत्यंत साध्यासोप्या स्वरूपात मांडणी केली. प्रा. पाटील म्हणाल्या की, भाषा ही मानवाला संवादी बनविते. भाषा विचार करायला, बोलायला शिकविते म्हणून संवाद हीच भाषेची खरी ओळख आहे. आजच्या आभासी युगात दृश्य प्रतिमा मानवी जीवनावर जणू आक्रमणाचा करताहेत. ही आक्रमणे माणसाला विचार कार्याला वेळच देत नाहीत. किंबहुना विचारांना प्रतिबंध होतो की काय हे देखील जाणवू देत नाहीत. याउलट शब्दप्रतिमा विचार करायला लावतात. विचारप्रक्रियेला चालना देतात. या शब्दप्रतिमांनीच भाषेचे महत्व टिकून आहे. म्हणूनच समाजात राहताना, कुटुंबात वावरताना आपण कायम संवादी राहिले पाहिजे. यासाठी आपल्याला भाषा जोडून ठेवत राहील. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. या दृष्टीने आपण आपल्या मराठी भाषेसह बोलीभाषा जपल्या पाहिजेत असे आवाहन डॉ. योगिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांनी केले तर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांनी आभार मानले. याप्रसंगी एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय दीक्षित, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील, कोषाध्यक्ष तुषार बाफना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाणे, नुरखान पठाण, पुरुषोत्तम गरुड, विद्यमान कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे, प्रा. मोहन मोरे, पुरुषोत्तम पाटील, आकाश सोनवणे, आवेश पठाण, पंकज पाटील, दीपक शिंदे, राकेश गाळणकर, अजिंक्य देवरे, वाल्मिक पाटील, जमील शाह, कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ यांच्यासह पत्रकार बांधव तसेच श्रोते उपस्थित होते.
बोलीभाषा माणसाला जगणे शिकवितात : प्रा. विलास चव्हाण
बोलीभाषांचे मानवी जीवनात फार महत्वाचे स्थान असते. कारण बोलीभाषा माणसाला खऱ्या अर्थाने जगणे शिकवितात असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विलास चव्हाण यांनी व्यक्त केले. चव्हाण पुढे म्हणले की, आपल्या मायबोलीतून जेव्हा आपण इतरांशी, समाजाशी संवाद साधतो तेव्हा माणूस म्हणून सर्वच बाबींचे आदानप्रदान होत असते. यात भाषा ही दुवा म्हणून काम करीत असते. मायबोली जेव्हा मातृभाषा बनते तेव्हा समाज संस्कारित होतो. त्यामुळे बोलीभाषेला असभ्य, गावंढळ, रांगडी म्हणून हिणविणे अयोग्य आहे. बोलीभाषेतूनच मानवी जीवनमान प्रतिबिंबित होत असते. माणसाचं माणूसपण बोलीभाषा अधोरेखित करते. म्हणूनच जी भाषा जगणे शिकवते, संवाद शिकवते ती प्रत्येक भाषा श्रेष्ठच आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.
भाषा कलेला समृद्ध बनविते : प्रा. डॉ. घनशाम थोरात
मानवी जीवनात जसे भाषेला, बोलीभाषेला महत्व आहे. तसेच महत्व कलेला देखील आहे. कलेचा भाषेशी प्रामुख्याने संबंध असतो. कलेला श्रोते व रसिकांसमोर नेण्यात भाषेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. भाषा ही कलेला अधिकाधिक समृद्ध बनवीत असते असे मत नॅक कमिटीने बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून गौरविलेले, पद्मश्री पंडित सुरेश वाडकर द्वारा गौरान्वित, पद्मभूषण पंडित उदित नारायण यांचे पाठशिष्य प्रा. डॉ. घनश्याम थोरात यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून थोरात यांनी विविध घटनांचे व इतिहासातील दाखले देऊन विषयाची समर्पक मांडणी केली. समजत असलेले पत्रकारितेचे स्थान व पत्रकारांच्या भूमिका यावरही थोरात यांनी भाष्य करून विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला.