संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या!
धुळे : भिवंडी येथील दलित विद्यार्थी संकेत भोसले याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत धुळे शहरात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला. मंगळवारी जोरदार निदर्शने करीत आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देत ही मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, भिवंडी येथे दलित विद्यार्थी संकेत भोसले याचा निर्घूणपणे खून करण्यात आला. महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी राज्य मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नांदेड येथील तरुण भीमसैनिक अक्षय भालेराव याचा गावात भीम जयंती साजरी केली म्हणून खून करण्यात आला होता. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अशा अनेक घटना गेल्या वर्षभरापासून यापूर्वी महाराष्ट्रात घडत आहेत.
संकेत भोसले हा सोळा वर्षांचा दलित विद्यार्थी इयत्ता अकरावीचे शिक्षण घेत होता. त्याच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी किरकोळ कारणावरून त्याचा वाद झाला. याचा राग मनात ठेवून संकेतच्या विरोधात आरोपीने कट रचला आणि 14 फेब्रुवारी रोजी या विद्यार्थ्याचे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कैलास धोत्रे व त्याचा मुलगा देवा धोत्रे त्यांचा भाचा करण लष्कर व अन्य शिवसेनेचे शिंदे गटातील पंधरा ते वीस कार्यकर्ते यांनी अपहरण करून तीन ते चार तास डांबून ठेवले. त्या ठिकाणी त्याचा अतोनात छळ करण्यात आला. छळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मूत्र पाजून व त्याच्या गुप्तांगावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करून त्याला मारहाण करण्यात आली.
दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना संकेत भोसलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. संकेतचा खून करणारे आरोपी व त्यांना मदत करणारे त्यांचे गुंड साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील आंबेडकरी समाजाचे तरुण-तरुणी महिला पुरुष उपस्थित होते.