धुळे तालुक्यातील 18 पाणीपुरवठा योजना रखडल्या, विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश
धुळे : जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील 18 पाणी पुरवठा योजना राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीविना रखडल्या आहेत. त्यामुळे तातडीने समितीची बैठक लावण्यात यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार बैठक लावण्याचे आदेश सदस्य सचिव (म. जि. प्रा.) यांना मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेचा मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.
धुळे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत रखडलेल्या धुळे तालुक्यातील 18 पाणी पुरवठा योजनां गती मिळावी म्हणून धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. पाटील यांनी राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक लावण्याची मागणी आपल्या पत्राव्दारे केली. त्यात आ.कुणाल पाटील यांनी म्हटले आहे कि, धुळे तालुक्यातील प्रतीपाडा (नांद्रे), खंडलाय बु., वडणे, पुरमेपाडा, बिलाडी, मोरशेवडी, अकलाड, धामणगाव, खंडलाय खु., निमगुळ, सडगाव, नरव्हाळ, न्याहळोद, लोणखेडी, अनकवाडी, कुळथे, मांडळ, सैताळे या गावातील पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेतंर्गत मंजुरी मिळाली आहे. या कामांची मान्यता व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक होत नसल्याने कार्यारंभ आदेश देता येत नाही. म्हणून या योजना रखडल्या आहेत. त्यामुळे या गावातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी ना.गुलाबराव पाटील यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. आ. कुणाल पाटील यांच्या पत्राची तातडीने दखल घेत राज्यस्तरीय विभाग समितीची त्वरीत बैठक घेण्यात यावी अशा सूचना सदस्य सचिव (म. जि. प्रा.) यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे.