शिरपूर तालुका पोलिसांनी पावणेदोन लाखांचा मद्यसाठा पकडला
धुळे : शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर नाकाबंदी करीत शिरपूर तालुका पोलिसांनी मद्यसाठ्याची वाहतूक करणारे वाहन पकडले. या वाहनाबद्दल पोलिसांना टीप मिळाली होती.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील आंबा-खांबाळे आणि मध्यप्रदेशातील वरला ही दोन्ही गावे सीमेवर आहेत. या गावांमध्ये फारसे अंतर नाही.
मध्यप्रदेश राज्यातील वरला येथून महाराष्ट्र राज्यातील आंबा-खांबाळे गावाकडे एक महिंद्रा मॅक्स कंपनीच्या गाडीतून (एम. एच. 29 जे. 0 261) बियरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार या मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले. ज्या वाहनाची टीप मिळाली होती ते वाहन पोलिसांनी अडविले. वाहन चालकाला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव राम बाबू भिल (वय 55, रा. पळासनेर, ता. शिरपूर) असे असल्याचे सांगितले. तसेच वाहनात काय आहे याबाबत विचारपूस केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशयित वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणले.
या वाहनाची पंचांसमक्ष पाहणी केली असता बियरच्या टीनचे 70 बॉक्स मिळून आले. बिअरच्या या साठ्याची एकूण किंमत एक लाख 83 हजार 120 रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बियरचा हा संपूर्ण साठा तसेच साडेतीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण पाच लाख 33 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, चालक हेड कॉन्स्टेबल येवलेकर, पोलीस कॉन्स्टेबल नेरकर, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा यांनी केली.