डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत जंगल संवर्धनासह विविध महत्वपूर्ण ठराव
अक्कलकुवा : नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होताहेत. सातपुड्यातील बचत गटांच्या शेकडो महिलांची गुरुवारी झालेली सभा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ठरली. महिला सक्षमीकरणासह शिक्षण आणि जंगल संवर्धनाचा निर्धार या महिलांनी केला.
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा येथे 7 मार्च रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 30 ऑगस्ट 2016 रोजी स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदिवासींचे कुलदैवत याहामोगी मातेचं प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी यांनी केलं. तर प्रभाग संघाच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालाचं वाचन प्रभाग संघाचे लेखापरीक्षक बहादुरसिंग तडवी यांनी केलं. प्रभागात सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रभाग समन्वयक संभाजी पावरा यांनी प्रकाश टाकला. यामध्ये प्रामुख्याने गट बांधणी, परसबाग निर्मिती, उत्पादक गटाचे व्यवसाय, भगराई कंपनीची वाटचाल, उपजीविका आधारित व्यवसाय, कर्ज परतफेड, बँक कर्ज, जोखीम प्रवणता निधी, कृतीसंगम निधी, फिरता निधी आदी विषयांवर प्रकाश टाकला.
महिलांना अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणुन सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. यामध्ये उत्कृष्ट ग्रामसंघ, प्रेरिका, उत्पादक गट, सिटीसी, लेखापाल, लेखापरिक्षक, कृषि सखी, उद्योग सखी, एफएलसीआरपी यांचा समावेश होता. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केलं. यामध्ये तालुका अभियान व्यवस्थापक प्रकाश वळवी, नाना पावरा, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत चावरे, तालुका व्यवस्थापक अशोक साळवे, किशोर पवार, प्रभाग समन्वयक विलास चौधरी, गिरीश वळवी आदींचा समावेश होता.
प्रभागाच्या अध्यक्षा वसंती राऊत, प्रेरीका वनिता तडवी, प्रभागातील अनेक महीलांनी अभिप्राय दिला.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांनी प्रभाग संघात सूरु असलेल्या कामांचे कौतुक केलं. तसेच प्रभाग संघानं स्वतचं कार्यालय तयार करावं, गाव साच्युरेशन, उद्योग उभारणी, उत्पादक वस्तूंवर ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग व्यवस्थित करणं, वृक्ष लागवड करून जंगल संवर्धन करणं, कुपोषण दूर करणं, मुलांच्या शिक्षणाला चालना देणं, स्थलांतर थांबविणं, विविध योजनांचा लाभ घेणं, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याचे प्रश्न सोडविणं, प्रभाग संघ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणं आदी विषयांवर मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रभाग संघांचे पदाधिकारी, महिला व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक संभाजी पावरा यांनी केलं.