आमदारांच्या निधीतून लावलेल्या दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगरचे नाव नसल्याने धुळ्यात आंदोलन
धुळे : शहराचे एमआयएम पक्षाचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्या निधीतून आणि संकल्पनेतून महानगरपालिकेने धुळे शहरात चाळीसगाव चौफुलीवर दिशादर्शक फलक उभारले. 4 मार्च रोजी आमदारांनी या फलकाचे लोकार्पण केले. परंतु दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगरचे नाव नसल्याने सोशल मीडियावरून प्रचंड टिका झाली. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने शुक्रवारी निर्णायक आंदोलन करून या वादाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लहान गावांचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु छत्रपती संभाजीनगरचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी शुक्रवारी समर्थकांसह आंदोलन करून क्रेनच्या सहायाने दिशादर्शक पत्रकावर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टिकर चिकटविले.
शहरानजीक चाळीसगाव चौफुलीवर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सतीश महाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. स्टिकर चिकटविल्यानंतर सतीश महाले यांनी सांगितले की, आमदार निधीतून दिशादर्शक फलक लावले जात आहेत. या चाळीसगाव रोड चौफुलीवर छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही फलक लावण्यात आलेला आहे. या फलकावर खेडे गावांची नावे घेण्यात आली. मात्र छत्रपती संभाजीनगर नाव वगळले आहे. केवळ वेरूळ, दौलताबादची नावे टाकण्यात आली. महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. त्यामुळे दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगरचे नाव का टाकले नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. फलकावर छत्रपती संभाजीनगरचे नाव नसत्याची बाब आम्हाला खटकत होती. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आम्ही या फलकावरील दौलताबाद नावाच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावले आहे. जेणेकरून या मार्गावरून जाणाऱ्यांना हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जातो हे निश्चित कळेल,असे सतीश मारले म्हणाले.
दरम्यान, अचानक झालेल्या आंदोलनात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.