विकासकामांचे गौडबंगाल, अधिकाऱ्यांवर वचक नाही, भीमशक्ती संघटनेने दिला इशारा
धुळे : जिल्ह्यातील विकास कामांमध्ये मोठे गौडबंगाल आहे. बेभरवशाचा कारभार सुरू आहे. संबंधीत अधिकाऱ्यांवर कुणाचाही वचक नाही, असा आरोप करीत आगामी निवडणुकीत आंबेडकरी बहुजन समाजाला एकत्र करून ताकद दाखवून देऊ, असा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
नियोजन आराखड्यातील निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या तांत्रिक मंजुरीबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप करीत कपिल दामोदर यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी साक्री रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यात विकासकामे करताना कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी न तपासता संबंधीत अधिकारी बेकायदेशीरपणे मान्यता व निधी देणार आहेत, अशी बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद धुळे येथील रस्ते, मार्ग व पुल, जन सुविधा, तिर्थक्षेत्र विकास इत्यादी योजना तसेच धुळे महानगरपालिकेतील संबंधी प्रशासकीय अधिकारी हे दलित वस्ती सुधार व नगरोत्थान या योजनांसाठी विकासकामांचा नियोजन बजेट होणार आहे. हा शासनाचा पैसा आहे. तो योग्य ठिकाणी कायदेशीर खर्च केला पाहिजे. तांत्रिक बाबी न तपासता विकास कामांचा प्रस्ताव संबंधीत अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील विकासकामांच्या तांत्रिक बाबी तपासल्याशिवाय कुठल्याही मान्यता देवून नयेत, निधी देवू नये, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना दिले आहे.
धुळे जिल्ह्यातील विकासकामांकरिता प्रस्ताव सादर केल्यानंतर दलित चेहरा आहे म्हणून मंत्रालयात कामे मंजुर केली नाहीत, असा आरोपही कपिल दामोदर यांनी केला.