धुळे लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान तर 4 जून रोजी होणार मतमोजणी
धुळे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. 02-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान तर 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होणार असून आजपासून धुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार असून या कार्यक्रमानुसार 02-धुळे लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्यात संपुर्ण निवडणूक प्रक्रिया होणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल, 2024 रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे, 2024 असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी करण्याचा दिनांक 4 मे, 2024 असा असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 6 मे, 2024 आहे. तर या निवडणूकीसाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होईल तर 4 जून, 2024 मतमोजणी होईल. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण असे 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
धुळे जिल्ह्यात 17 हजार 321 इतक्या 18 ते 23 वयोगटातील नवीन मतदारांची नोंद झाली आहेत. तर 85 वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या 23 हजार इतकी आहे. जिल्ह्यात 10 हजार 900 इतके मतदार हे दिव्यांग असून आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात 1 हजार 704 मतदान केंद्र राहणार असून 54 मतदान केंद्र हे क्रिटीकल आहेत. त्याठिकाणी वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाच्या सूचनानुसार 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सेक्टर अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबरच बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील 17 लाख 27 हजार 476 मतदार मतदानांचा हक्क बजावणार आहे. तर 02-धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण 3 लाख 87 हजार 955 , धुळे शहर 3 लाख 34 हजार 510, शिंदखेडा 3 लाख 27 हजार 255, मालेगाव मध्य 2 लाख 96 हजार 2, मालेगाव बाह्य 3 लाख 53 हजार 670 तसेच बागलाण 2 लाख 84 हजार 331 असे एकूण 19 लाख 83 हजार 723 मतदारांची संख्या आहे.
जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत ज्याठिकाणी कमी मतदान झाले होते, अशा ठिकाणी मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेज मध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने आखलेल्या बंदोबस्त आराखडा व केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : जिल्हा निवडणूक अधिकारी
धुळे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू केली आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान, तर 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नोडल अधिकारी तसेच विभाग प्रमुखांनी सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले सर्व नोडल अधिकारी व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. सर्व विभागांनी 24 तासात शासकीय इमारतीवरील आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून त्यांचा अहवाल सादर करावा. कोणत्याही नवीन कामांची प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश, प्रशासकीय मान्यता देण्यात येवू नये. तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी राजकीय व्यक्तींसोबत बैठका घेवू नये. तसेच कोणत्याही रॅलीत सहभागी होवू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने तातडीने जमा करावीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व एसटी बसेसवर लावण्यात आलेला जाहिरात मजकूर तातडीने काढण्यात यावा. नोडल अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता पुस्तिकेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करण्यासाठी नागरिकांनी सी-व्हिजल या मोबाईल ॲपचा वापर करावा. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. या तक्रारींवर आचारसंहिता कक्षामार्फत त्वरीत कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेचे पालन करीत असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला कळवावे.
निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर होणार नाही याची सर्व विभागप्रमुख यांनी दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील शस्त्रपरवाना धारकांनी शस्त्रे जमा करावे
धुळे ; धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुक आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहात असतील त्या पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र जमा करावे. असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.
जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गृह विभाग यांचेकडील दि. 17 ऑगस्ट, 2009, दि. 20 सप्टेंबर, 2014 व दि.30 मार्च, 2015 मधील मार्गदर्शक सूचनेनुसार धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधीत संबंधित पोलीस स्टेशनला जमा होणेसाठी पोलीस विभागाने कळविले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या कालावधीत लोकसभा निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याने सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जिवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी त्यांनी धारण केलेल्या शस्त्र, परवान्यावरील शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावी.
त्याप्रमाणे न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांचेकडेस असलेले नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व नोंदणीकृत खाजगी सुरक्षा रक्षक यांना त्यांचेकडे असलेले शस्त्र जमा करणेबाबत सुट देण्यात येत आहे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणे शक्य नाही. अशा शस्त्र परवानाधारकांनी गुरुवार, दिनांक 21 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यत जिल्हादंडाधिकारी धुळे तथा समिती अध्यक्ष, गृह शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्वयंस्पष्ट कारणासह स्वतंत्र अर्ज सादर करावा. त्यानुसार प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरणनिहाय निर्णय घेईल, असेही जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.