धुळे झेडपी सभागृहाच्या अविश्वास ठरावावर मात करीत सीईओंच्या बंगल्यात पार्टी
धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहाने सर्वानुमते मंजूर केलेल्या अविश्वास ठरावावर मात करीत, वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या बंगल्यावर रविवारी अधिकाऱ्यांची पार्टी रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या शिक्षकांच्या बदल्या आणि प्रमोशनावरून हा वाद सुरू झाला आहे, त्या शिक्षकांनी सीईओ शुभम गुप्ता यांचा जंगी सत्कार केल्याचीही माहिती जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे सदस्य मॅनेज झाले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मनमानी कारभार अन् अविश्वास ठराव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ‘हम करे सो कायदा’ अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या 51 सदस्यांनी 13 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सीईओ गुप्ता यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही सदस्यांनी मुंबईला मंत्रालयात जावून मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यामुळे सीईओ शुभम गुप्ता यांच्या बदलीची शनिवारी चर्चा होती. परंतु तसे आदेश प्राप्त झाले नाहीत. रविवारी सुटी असल्याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
सीईओंच्या बंगल्यावर पार्टी? : दरम्यान, रविवारी दुपारी सीईओंच्या बंगल्यावर विभागप्रमुखांची पार्टी झाल्याची चर्चा आहे. ही पार्टी काही शिक्षकांनी मॅनेज करून दिल्याचेही बोलले जात आहे. सीईओंच्या बंगल्यावर पार्टी झाली म्हणजे त्यांनी मॅनेज करून त्यांची बदली रद्द करुन आणल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या आनंदात बंगल्याच्या बाहेर टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या रांगा लागल्या होत्या. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गर्दीत काही खासगी पंटरांचीही धावपळ सुरू होती. अविश्वास ठराव झाल्याच्या दिनांकापासून सीईओंनी फाईलींवर सह्या करणे बंद केले होते. परंतु रविवारी सुटीच्या दिवशी सीईओंनी अनेक फाईलींवर सह्या केल्याचे सांगण्यात आले.
‘त्या’ शिक्षकांनी केला सत्कार : काही शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत सीईओंशी ‘अर्थपूर्ण’ चर्चा झाली होती. त्यांना ईमेलवर तसे आदेशही प्राप्त झाले होते. परंतु अविश्वास ठरावामुळे आपले नुकसान होते की काय? अशी शंका या शिक्षकांना होती. त्यामुळे रविवारी दुपारी हे शिक्षक बंगल्यावर आले होते. यावेळी ”कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी लवकर जाणार नाही. सगळ्यांचे काम होईल.”, असा शब्द मिळाल्यानंतर त्या शिक्षकांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सीईओंचा सत्कार केला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.