दुचाकी चोरांच्या टोळीसह सोनसाखळी चोरालाही पकडले, जुगाराच्या अड्ड्यावर धाड
धुळे : येथील पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यात आघाडी घेतली आहे. दुचाकी चोरांच्या टोळीसह महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्यालाही पोलिसांनी गजाआड केले. धुळे शहरातील जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला. सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत ही कारवाई केली.
दुचाकी चोरांच्या टोळी : धुळे शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरीला गेलेल्या असल्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी त्यांच्या पथकाला मोटर सायकल चोरी करणार्या टोळी विषयी माहिती काढून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या .मालेगाव शहरातील रमजानपुरा भागातील वसीम येडा हा त्याच्या टोळीच्या माध्यमातून धुळ्यात मोटरसायकल चोरी करत असल्याची माहिती एएसपी रेड्डींच्या पथकाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पथक मालेगावला आले. मालेगाव येथे जावून एएसपी रेड्डींच्या पथकाने वसीम येडा उर्फ वसीम अहमद साजीद अहम अन्सारी (वय २४) रा. रमजानपुरा मिलन हॉटेल जवळ, अफसर अली अजगर अली (वय २८) रा. गोल्डन नगर, गोसिया मशिद जवळ, मालेगाव, शेख साजीद शेख अजीज रा. जाफर नगर, नुर मशिदमागे मालेगाव या तिघांना ताब्यात घेवून अटक केली. टोळीतील तीन साथीदार मात्र फरार आहे. त्यांचाही शोध सुरु आहे. एएसपींच्या पथकाच्या चौकशीत या टोळीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. ३ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ७ मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. धुळे शहर उपविभागातील ३, जळगाव जिल्ह्याच्या पारोळा पोलिस ठाण्यातील एक आणि येवला पोलिस ठाण्यातील एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहे.
सोनसाखळी चोरालाही पकडले : धुळ्याच्या देवपुरातील नकाणे रोडवरील महिलेच्या सोनसाखळी चोरीतील आरोपीलाही पथकाने अटक केली आहे. देवपुरातील नकाणे रोडवरील साईबाबा मंगल कार्यालयाजवळ सरला पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी खेचून पलायन केले होते. पश्चिम देवपूर पोलिसात १ मार्च रोजी गुन्हाही दाखल झाला होता. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलिस अधिक्षक काळे यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील सलमान सलीम इरानी हा सोनसाखळी चोरीत सामील असल्याचे पक्के झाल्याने पथक श्रीरामपूरला गेले. तेथे त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल करत गुन्ह्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून दिली.
जुगाराच्या अड्ड्यावर धाड : धुळे शहराच्या जुनी भिलाटी जवळील कानुश्री मंगल कार्यालया मागील परिसरात काटेरी झुडूपात जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन काल एएसपी रेड्डींच्या पथकाने छापा टाकला. चार जुगारींना रंगेहात पकडले.त्यांच्याकडून ३८ हजार ९४० रुपये आणि जुगाराचे साहित्य आढळून आले. याप्रकरणात दोन आरोपी फरार आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई : पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी व त्याांच्या पथकातील पीएसआय दत्तात्रय उजय, चंद्रकांत जोशी, एएसआय कैलास पाटील, कबिर शेख, सुनिल पाथरवट, धर्मेंद्र मोहिते, अविनाश वाघ, बापू पाटील, सागर थाटशिंगारे, मकसुद पठाण, विवेक साळूंखे, सोमनाथ चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.