व्यापारी संकुलातील गाळा हडपला, पत्रकार परिषदेत लोंढेंची कैफियत
धुळे : शहरातील साक्री रोडवरील मोती नाल्यानजीक असलेल्या झगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळा सोनल दिलीप शिंदे यांनी हडपला असून यंत्रणा अत्यंत धिम्या गतीने काम करीत असल्याने यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती गाळा मालक गुलाबराव झगाशेठ लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे म्हणाले की, झगाशेठ लोंढे व्यापारी संकुलात ८ गाळे काढण्यात आले आहे. त्यातील सहा नंबरचा गाळा हा माझ्या स्वमालकीचा आहे. बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी पाटोळे यांनी पाच नंबरचा गाळा विकत घेतला. परंतु त्याचे काम सुरु असल्याने गुडफेथ मध्ये सहा नंबरचा गाळा त्यांना वापरायला दिला.त्यानंतर त्यांनी गाळा सोनल दिलीप शिंदे यांना विकला. सोनल शिंदेंनी पाच,सहा आणि सात नंबरचा गाळा ताब्यात घेतला.कागद पत्रांमध्ये फेरफार केली. सहा नंबरचा गाळा नसल्याचे कागदपत्र तयार केले.
सध्या माझ्या या सहानंबरच्या गाळात प्रिंन्स वाईन शॉप हे बेकायदेशिररित्या सुरु आहे. माझ्या मालकीच्या या दुकानातील दारु विक्री प्रशासनाने बंद करावी. २०१५ पासून राज्य उत्पादन शुल्कसह मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वत्र तक्रारी केल्या. परंतु कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. प्रशासनाने कारवाई वेग द्यावा यासाठी मी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे गुलाबराव लोंढे यांनी सांगितले.