निवडणुकीच्या तोंडावर धुळे पोलीसांनी पकडला 17 लाखांचा मद्यसाठा
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲलर्ट झाले असून, त्यांनी ठीकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मद्यसाठा आणि पैशांची अवैध वाहतूक होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत. दरम्यान, धुळे क्राईम ब्रांचने अवैधरित्या मद्यसाठा वाहून नेणारा आयशर ट्रक पकडला असून, त्यातून 16 लाख 89 हजार 600 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारु वाहतुक आणि विक्रीला ऊत आला आहे. राज्य, परराज्यातून अवैधरित्या दारुची वाहतुक केली जात आहे. त्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर आयशरमधून पुष्पा स्टाईल होणारी दारुची वाहतुक उधळून लावली आहे. पायलट कारसह सुमारे ३७ लाखांची दारु जप्त करण्यात आली असून, चौघां संशयीतांना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पेशल ड्राईव्ह घेवून अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधिकार्यांना दिले आहे.त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेष विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथके तयार करुन धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह सुरु केले आहे. काल एलसीबीच्या पथकाने जुगाराच्या ८ आणि प्रोव्हीबिशनच्या ५ अशा १३ केसेस केल्या आहेत.
तसेच आयशर वाहनातून मुंबई-आग्रा महामार्गावरुन लाखो रुपयांची अवैध दारु शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना रात्री मिळाली. या बातमीच्या आधारे पीआय शिंदे यांनी एलसीबीच्या पथकाला आयशरचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.नगाव ता. धुळे गावच्या शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने जाणार्या एम.एच.४७ बी.एल.२९६७ क्रमांकाची स्वीफ्ट कार आणि तिच्या मागे असलेेल्या एम.एच.०५ ए.एम. ७१७६ क्रमांकाच्या आयशर गाडीबाबत संशय आला. एलसीबीच्या पथकाने आयशर आणि कारची चौकशी सुरु केली. प्रदूम्न जीतनारायण यादव (वय २५) रा.गांधीनगर,कांदीवली, विरेंद्र कल्पनाथ मिश्रा (वय ३५) रा.कामन रोड,वसई, श्रीराम सुधाकर पारडे (वय ३२) रा.सुचत नाका, कल्याणपूर्व,राकेश रामस्वरुप वर्मा (वय ६०) रा. सविनाखेडा माताजी मंदिराजवळ, उदयपूर अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांचे वर्तन आणि हालचाली संशयास्पद वाटत असल्याने दोघां वाहनांसह चौघांना पोलिस अधिक्षक कार्यालयात आणले. आयाशरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचे दिसले. परंतु आयशरमध्ये जावून तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्यांचे चौकोनी बॉक्स तयार करुन त्यामध्ये रॉयल ब्ल्यू कंपनीची १६ लाख १९ हजार ६०० रुपयांची व्हिस्की आढळून आली. ३२० बॉक्समध्ये ही व्हीस्की ठेवण्यात आली आली. आयशर आणि कारसह ३६ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम देवपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीपीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, पंकज खैरमोडे,महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, राजेंद्र गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.