शिक्षिकेकडून एक हजारांची लाच घेणारा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन संचलित आदर्श हायस्कूलमधील शिक्षिकेकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 19 मार्च रोजी सकाळी ही कारवाई केली,अशी माहिती एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली.
प्रदीप पुंडलिक परदेशी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. कुसुंबा तालुका धुळे येथील आदर्श शाळेत त ते कार्यरत आहेत. शाळेत आयोजित केलेल्या एका उपक्रमामध्ये खर्च झाल्याचे निमित्त करून शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 800 रुपये द्यावेत, असे आदेश मुख्याध्यापकांनी बैठक घेऊन सर्वांना दिले. परंतु एका महिला शिक्षिकेने विरोध दर्शविला. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करता येणार नाही, असे सांगत मुख्याध्यापकांनी सही करण्यास नकार दिला होता. सही करावयाची असेल तर एक हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी या मुख्याध्यापकांनी तक्रारदार शिक्षिकेकडे केली होती. त्यामुळे संबंधित शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार केली.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केली. मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी पंचांसमक्ष एक हजार रुपये लाच मागितली. एवढेच नव्हे तर 19 मार्च रोजी आदर्श विद्यालयात मुख्याध्यापक कक्षामध्ये मुख्याध्यापक यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक परदेशी यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे या पथकाने केली.
या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.