संकटात सापडलेल्या पीडिताला चार मिनिटांच्या आत मदत करणारे धुळे पोलीस राज्यात तिसऱ्या तर नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांकावर
धुळे : संकटात सापडलेल्या पीडिताला डायल 112 प्रणालीद्वारे चार मिनिटांच्या आत मदत करणाऱ्या धुळे पोलिसांनी राज्यात तिसरा तर नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकाविला. ही कामगिरी बजाविणाऱ्या टिमचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सोमवारी यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (MERS) डायल 112 या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत, संकटात सापडलेल्या नागरिकांना त्वरीत मदत करण्याची जबाबदारी या प्रणालीतील पोलिसांची आहे. नेमून दिलेल्या वेळेच्या आत मदत पोहोचविणे हे त्यांचे कर्तव्य असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाने याआधीच दिल्या आहेत. तंतोतंत कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहेत.
असे चालते डायल 112 प्रणालीचे काम : महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम (MERS) डायल 112 या प्रकल्पान्वये, पीडित व्यक्ती हा त्याला मदत मिळण्यासाठी 112 क्रमांक डायल करून प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई अथवा द्वितीय संपर्क केंद्र नागपूर यांच्याशी संपर्क साधतो. माहिती दिल्यानंतर तो कॉल धुळे जिल्हा घटकाच्या डायल 112 नियंत्रण कक्ष येथे डिस्पॅचर यांच्याकडे प्राप्त होतो. डिस्पॅचर हे सदरचा कॉल पीडित व्यक्तीच्या नजीकच्या पोलीस स्टेशन स्तरावरील ERV-MDT डिवाइसवर पाठवितात. सदर एमडीटी डिवाइसमध्ये कॉल प्राप्त होताच एमडीटी कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी यांनी तो कॉल पाहून निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करणे अनिवार्य व आवश्यक आहे. पीडितास तात्काळ मदत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.
अत्याधुनिक नियंत्रण कक्ष : डायल 112 च्या सिस्टीम करिता धुळे नियंत्रण कक्षात पाच अत्याधुनिक कॉम्प्युटर सिस्टीम व एक सुपरवायझर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे डायल 112 ची एकूण 35 चारचाकी आणि 34 दुचाकी वाहने आहेत. या वाहनांवर MDT TAB बसविण्यात आले आहेत. सदर कार्यप्रणालीवर पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण आहे.
धुळे पोलीस शेवटच्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर : धुळे जिल्हा डायल 112 प्रणालीचा माहे जानेवारी 2024 मध्ये पीडीतास पोलीस मदत पोहोचविण्याचा रिस्पॉन्स टाईम हा 15.51 मिनिटे असा होता. तो महाराष्ट्रातील एकूण 45 घटकांपैकी शेवटच्या क्रमांकावर होता. त्यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याने फेब्रुवारी महिन्याचा रिस्पॉन्स टाईम हा 10.35 मिनिटे एवढा कमी होऊन तो 40 व्या क्रमांकावर गेला. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी पुन्हा आढावा घेऊन परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. पीडितास तात्काळ पोलीस मदत कशी पोहोचेल याबाबत नियोजन करून त्याची तंतोतंत अंमलबजावणी होण्यासाठी प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटिकोंडलवार यांना सूचना व मार्गदर्शन केले. त्यामुळे मार्च 2024 मध्ये पीडितास पोलीस मदत पोहोचविण्याचा रिस्पॉन्स टाईम हा चक्क 3.50 मिनिटे झाला. इतक्या कमी वेळेत थेट पीडितास तात्काळ मदत पोहोचविणारा महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नामांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मीरा-भाईंदर व द्वितीय क्रमांकावर मुंबई शहर यांना नामांकन मिळाले आहे. धुळे जिल्हा पोलीस दल तिसऱ्या क्रमांकावर आल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी डायल 112 टीमचे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले नामांकन : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डायल 112 कार्यप्रणालीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटिकोंडलवार, महिंद्रा डिफेन्सचे अभियंता योगेश काकडे, तुषार सोनवणे, डायल 112 चे डिस्पॅचर हेड कॉन्स्टेबल वाघ, खलाणे, निकुंभे, महिला हेडकॉन्स्टेबल भोई, पोलीस नाईक बोरसे, कॉन्स्टेबल शेंडगे, महिला कॉन्स्टेबल चौधरी यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे प्रतिसादक यांच्या प्रयत्नांमुळे नामांकन मिळाले.