Dhule LCB police inspector Dattatray Shinde red-handed in taking bribes
धुळे एलसीबी पोलीस निरीक्षकासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
धुळे : जिल्ह्यातील एका राजकीय आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याचा हद्दपारचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार अशोक पाटील आणि नितीन मोहने या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार हे धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रहिवासी आहेत. ते राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. तक्रारदार यांचे त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने राजकीय आकसापोटी त्यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात राजकीय गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेतली. तक्रारदार यांच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवून जिल्ह्यातून हद्दपार करणार आहोत, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले. हद्दपारची कारवाई होऊ द्यायची नसेल तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले. तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट तक्रारदारांनी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे तक्रारदार यांनी एक एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एक एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन पडताळणी केली असता, पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदरची रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील यांना देण्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांनी तळजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. दोंडाईचा येथे दोंडाईचा-धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली. या कारवाईसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.