लाचखोर एलसीबी पीआयच्या घरातून सोन्याची बिस्किटे जप्त, सव्वादोन कोटींचे घबाड
धुळे : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरातून 60 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने झडतीमध्ये आढळून आली. याशिवाय 77 हजार रुपये किमतीची चांदीची भांडी व दागिने, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे एक कोटी 75 लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्तऐवज देखील आढळून आले आहेत. एकूण दोन कोटी 35 लाख 77 हजारांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार नितीन मोहने आणि पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्याविरुद्ध 1 एप्रिल रोजी सापळा कारवाई होऊन 2 एप्रिल रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7.7 (अ) व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हात त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता आढळून आली असून, हे संपूर्ण घबाड जप्त करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी करीत आहेत.
हेही वाचा