संदेश भूमिवर प्रबोधनपर कार्यक्रमांनी साजरी होणार बाबासाहेबांची जयंती
धुळे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्पर्श लाभलेल्या धुळे शहरातील संदेश भूमि येथे बाबासाहेबांची जयंती वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त संदेश भूमी धुळे येथे रविवारी 24 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता नियोजन व विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला संदेश भूमीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात संदेश भूमी येथे साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रामुख्याने निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान परीक्षा तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात श्रामणेर शिबीर देखील आयोजित करण्यात यावे असे उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सुचविले. श्रामणेर शिबीराला भोजन दान, सकाळचा चहा-नाश्ता, सायंकाळी फलहार यासाठी दानदात्यांनी स्वयंस्फूर्तीने नावे नोंदवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि. का. गवळे उपस्थित होते. बैठकीला संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, प्रा.सतिष निकम, ॲड. सतिष अहिरे, ॲड. कृष्णा निमगडे, विजय सुर्यवंशी, चंद्रगुप्त खैरनार, बाळासाहेब अहिरे, डॉ. शरद भामरे, भिकन नेरकर, दिनेश पगारे, राहुल बच्छाव, मनोहर पगारे, अशिषकुमार गजभिये, नाना साळवे, दीपक नगराळे, ईश्वर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संदेश भूमि येथे आयोजित बाबासाहेबांच्या जयंती उत्सवासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीतर्फे करण्यात आले.