धुळे लोकसभा : नेमकं काय चाललंय मतदार संघात?
धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसला अजुनही सक्षम उमेदवार मिळालेला नाही. वंचित बहुजन आघाडीने आयपीएस अधिकारी अब्दुर रहेमान यांना उमेदवारी दिली असली तरी शासनाने त्यांचा राजीनामा अजुनही मंजूर केला नसल्याने त्यांची उमेदवारी अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे. दोन आमदारांचा जनाधार असलेला एआयएमआयएम पक्ष देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. पण या पक्षाने अजुनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, काॅंग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. सुभाष भामरे यांची हॅट्ट्रिक होईल किंवा नाही असा निष्कर्ष काढणे आता तरी कठीण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काॅंग्रेसच्या उमेदवारीचे भिजत घोंगडे : मोदी लाटेच्या आधी काॅंग्रेसचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला सुटला आहे. पण काँग्रेसनं अद्याप उमेदवारीच जाहीर केलेला नाही. त्यामुळं काँग्रेसकडं तसा ताकदीचा उमेदवार नसल्याची चर्चा होती. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारी करण्याबाबत स्पष्ट नकार दिल्याने सुरूवातीला धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे यांच्या नावांची चर्चा होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी माजी आमदार सुधीर तांबे यांचेही नाव पुढे आले. आता माजी राज्यमंत्री आणि नाशिकच्या माजी महापौर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव आता पुढे येत आहे. परंतु काॅंग्रेसने कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
वंचितच्या उमेदवाराच्या वैधतेबाबत शंका : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात आयपीएस अधिकारी अब्दुर रहेमान यांना उमेदवारी दिली. अब्दुर रहेमान पूर्वी धुळ्याचे पोलीस अधीक्षक होते. त्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी जनसंपर्क आहे. दलित आणि मुस्लिम मतदार संख्येचे गणित डोळ्यासमोर ठेवून वंचितने त्यांना उमेदवारी दिली खरी; पण सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून त्यांनी आयपीएस अधिकारी पदाचा दिलेला राजीनामा शासनाने अजुनही मंजूर केलेला नाही. त्यामुळे अब्दुर रहेमान यांनी शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजीनामा मंजूर झाला नाही तर त्यांच्या उमेदवारीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्हच असेल. काही मतदार संघांमध्ये उमेदवार बदलण्याची वेळ आलेल्या वंचितला धुळ्यातही उमेदवार बदलावा लागतो कि काय? असा प्रश्न आहे. गेल्या पंचवार्षिकला देखील वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला होता.
एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष : मुस्लीम मतदारांची संख्या आणि एमआयएमची शक्ती यामुळे एमआयएम काय भूमिका घेणार त्याकडेही लक्ष लागलेले आहे. मालेगाव आणि धुळे शहर असे दोन आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार देण्याबाबत पक्षश्रेष्ठी विचारविनीमय करत असल्याचे आमदार डॉ. फारूख शाह यांनी माध्यमांना सांगितले होते. परंतु कालांतराने उमेदवार देणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळाली. आता पुन्हा उमेदवार देण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. एमआयएमने उमेदवार दिला तर निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
डॉ. सुभाष भामरेंना अंतर्गत विरोध? : सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी भाजपने कायम ठेवली आहे. त्यामुळे खासदारकीची हॅटट्रिक करण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. दरम्यान, धुळे शहरात भाजपमध्ये दोन गट पडल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. तशी धुसफुसही सुरू आहे. राहुल गांधींच्या विरोधात झालेले भाजपचे एक आंदोलन दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. परंतु गेल्या आठवड्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात, “मी भाजपच्या पालखीचा भोई असून, भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी तन-मन-धनाने प्रचार करेल”, असे जाहीर करून अनुप अग्रवाल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
परंतु डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला महायुतीमधून अंतर्गत विरोध असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी त्यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. डॉ. भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगावमध्ये तसे बॅनरही झळकले होते. दादा भुसे यांचे प्राबल्य केवळ मालेगाव बाह्यमध्येच नाही तर सटाणा आणि बागलानच्या पट्ट्यातही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. दादा भुसेंच्या नाराजीचा फटका डॉ. भामरेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
डॉ. सुभाष भामरे यांना सलग दोन टर्म उमेदवारी मिळाल्याने भाजप यावेळी उमेदवार बदलणार अशी अनेकांना आशा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे भुसेंबरोबरच इतरही अनेक इच्छुकांच्या मनात नाराजी असल्याची चर्चा आहे.
असा आहे धुळे मतदारसंघाच्या राजकारणाचा इतिहास : लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यांचा भाग या मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. तसेच बहुजन, आदिवासी, मुस्लीम अशा संमिश्र मतदारांचा प्रभाव असल्याने या मतदारसंघाच्या निकालांकडे लक्ष लागलेले असते. काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपने गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ.
धुळे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीलाच जनसंघाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळवून देणारा मतदारसंघ होता. 1957 मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील धुळ्याचे पहिले खासदार निवडून आले होते. भाजपचे रामदास रुपला गावितही या मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यानंतर काँग्रेसने या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. ते तीन दशकांपर्यंत कायम राहिले. या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुडामन पाटील तीन वेळा, विजय नवल पाटील एकदा तर रेश्मा भोये तीन वेळा, बापू चौरे एक वेळा खासदार बनले. नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना मतदारांनी दरवेळी बदलून संधी दिली. पण 2009 नंतर मात्र मतदारसंघामधली ही परिस्थिती बदलली. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहे. 2009 मध्ये भाजपकडून प्रतापराव सोनवणे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी अमरीशभाई पटेल यांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरेंना इथून संधी मिळाली. त्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवत भाजपचे वर्चस्व कायम ठेवले.
भाजपने 2014 च्या निवडणुकीत संधी दिलेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी अमरीशभाई पटेल यांच्या विरोधात सव्वा लाखांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे 2019 मध्येही पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. डॉ. भामरे यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाच्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारी देखिल होती. काँग्रेसने मात्र 2019 मध्ये उमेदवार बदलला आणि कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवले. पण भामरेंच्या विरोधात त्यांनाही विजय मिळवता आला नाही. सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल : धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि शिंदखेडा हे धुळे जिल्ह्यातील तर मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2019 लोकसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या सहापैकी दोन ठिकाणी एआयएमआयएम, दोन ठिकाणी भाजप आणि प्रत्येक एका ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे एकमेव आमदार दादा भुसे हे शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले.
निवडणुकीत हे मुद्दे ठरणार महत्वाचे : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तिसऱ्यांदा बाजी मारतात किंवा नाही? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीकडून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. महायुतीमधील अंतर्गत नाराजी हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. भाजपच्या प्रचार सभांमध्ये केवळ वैयक्तिक लाभाच्या योजना आणि देश पातळीवरील मुद्यांवर भर दिला जात आहे. परंतु मतदारसंघाचा सर्वांगिण विकास आणि स्थानिक प्रश्नांच्या बाबतीत नाराजी आहे. हमीभाव न मिळाल्याने कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरीही नाराज असल्याचा प्रचार महाविकास आघाडीतर्फे सुरू आहे. भाजप सरकारच्या काळात आवाक्याबाहेर गेलेल्या पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती, बेरोजगारी हे मुद्दे देखील महत्वाचे ठरणार आहेत. एम आयएमची भूमिका निर्णायक ठरू शकते. याशिवाय स्थानिक उमेदवार हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असणार आहे. पण तो नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांना लागु पडतो.
या सर्व शक्यतांच्या राजकारणात 20 मे रोजी मतदार कुणाच्या बाजूनं निर्णय देणार याकडंच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.