सजीव देखावासह पहिल्यांदाच सकाळी निघणार शोभायात्रा : उमेश चौधरी
धुळे : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी धुळे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. विविध सजीव देखाव्यांसह निघणाऱ्या या शोभायात्रेत पहिल्यांदाच महिलांचे शंखनाद पथकही असेल. त्यासाठी दीडशे महिला शंखनाद सराव करीत आहेत.
विश्व हिंदू परिषदेतर्फे गुढीपाडवानिमित्त एकवीरा देवी मंदिरापासून मंगळवारी सकाळी ८ वाजता सजीव देखाव्यांसह हिंदू बांधवांची शोभायात्रा काढली जाणार आहे. विविध मार्गावरुन निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात आरतीने होईल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी, नरेश रुणवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्व हिंदू परिषद धुळे आयोजित हिंदू नवपर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने गुढीपाडवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यासंदर्भात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी रवी बेलपाठक, भाऊ महाराज रुद्र, सोमनाथ गुरव, आबा शिनकर, नंदलाल रुणवाल, मुलचंद संघवी, भैय्या देवळे आदी उपस्थित होते.
एकवीरा देवी मंदिरात शोभायात्रेबाबत नुकतीच बैठक झाली होती. दरवर्षी सायंकाळी शोभायात्रा निघत असते. यंदा त्यात बदल करुन उगवत्या सुर्याप्रमाणे सकाळी शोभायात्रा काढावी असे ठरविण्यात आले. त्याला सर्वांनी सहमती दर्शविल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे (देहूकर) आणि स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख महंत पूज्य आनंदजीवन स्वामी या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात होईल. ही शोभायात्रा पुढे नेहरु चौक, पंचवटी, मोठा पूल, महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, जुने अमळनेर स्टँड, गल्ली नंबर ६ वरुन सरळ तुकाराम विजय व्यायाम शाळा चौक मार्गे चैनी रोड, गल्ली नंबर ४, सन्मान व्हिडीओकडून राजकमल सिनेमामार्गे आग्रा रोडने श्रीराम मंदिरात समारोप होईल. तेथे आरती केली जाईल.
या शोभायात्रेत सजीव देखावे, हनुमान सेना, सनातन धर्म, समृध्द भारत, मतदान जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, महिलांचे शंखनाद, वारकरी, ढोलपथक यांचा समावेश राहणार आहे. या शोभायात्रेत नागरिकांनी मतदान करावे अशी जनजागृती देखील केली जाणार आहे. हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.