ओबीसी आरक्षणाचा पुळका निवडणुकांपुरताच, ओबीसी नेते संजय गाते यांची महाविकास आघाडीतील पक्षांवर टिका
धुळे : ओबीसी आरक्षणाचा खून करणाऱ्या काॅंग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी रविवारी धुळे येथे ओबीसी समाजाला केले.
निवडणुका जवळ आल्या, की काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना ओबीसींचा पुळका येतो. निवडणुका झाल्या, की हा पुळका ओसरतो आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे दलित व इतर मागास समाजांसोबतच १९५३-५४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी व काँग्रेसने ओबीसी समाजालाही आरक्षण दिले असते, तर आज ओबीसी समाजही पुढारलेला असता. मात्र, काँग्रेसने सातत्याने ओबीसी आरक्षणाचा खून केला. अशा विरोधकांना आता कायमचे सत्तेपासून दूर ठेवा आणि ओबीसी समाजाला न्याय देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा निवडून द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सकल ओबीसी समाजासाठीच्या सर्व जनकल्याणकारी योजनांची समाजातील सर्व घटकांना माहिती व्हावी, या अनुषंगाने आज भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या धुळे महानगर शाखेतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी सामाजिक संमेलन येथील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये झाले, त्यात प्रदेशाध्यक्ष गाते बोलत होते. संमेलनाला लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, भाजप ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा बोरसे, मनोज ब्राह्मणकर, डॉ. योगेश ठाकरे, भाजप ओबीसी युवक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकी परदेशी, युवती जिल्हाध्यक्षा हर्षदा दुसाने, महादेव परदेशी, भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या डॉ. माधुरी बोरसे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, राष्टवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, सुषमा गोराणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, भगवान गवळी, नरेश चौधरी, भिकन वराडे, सुरेश बहाळकर, रेखा गवळी, मोहिनी गौड, राजेश पवार, नरेश सोनार, अशोक बडगुजर, ॲड. रोहित चांदोडे, यांच्यासह ओबीसीतील विविध समाजांचे अध्यक्ष, महिला, युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.
भाजपमुळे ओबीसींना आरक्षण : गाते म्हणाले, की भारतीय जनता पक्ष २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत होतो. यामुळेच श्री. मोदी यांनी यावेळी ४०० पारचा नारा दिला आहे. सध्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना ओबीसींची पुळका आला आहे. मात्र, ओबीसींचे कल्याण केवळ भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९५३-५४ मध्ये काका कालेलकर यांचा आयोग मान्य केला असता आणि त्यानुसार ओबीसींना आरक्षण दिले असते, तर आज ओबीसी समाज दलित, आदिवासी बांधवांसारखे पुढारलेला दिसला असता. आमचा शैक्षणिक, आर्थिक विकास झाला असता. ओबीसी समाजाचे अधिकारीही आज उच्च पदावर दिसले असते. ओबीसी आरक्षणाचा खून करण्याचे पातक काँग्रेसने केले, पंडित नेहरूंनी केले. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधीनंतर राहुल गांधीने केले. राज्यातही नाना पटोलेंपासून वडेट्टीवारांपर्यंत एकाही काँग्रेस नेत्याला ओबीसींबद्दल बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही. १९९० मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर केंद्रात सत्तेवर आलेल्या व्ही. पी. सिंह सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत ओबीसींना सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले. काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला कायम विरोधच केला. ५४ टक्के असलेला ओबीसी समाज निरक्षर ठेवून त्याचे शोषण करण्याचे काम काँग्रेसने केले.
भाजपचा डीएनए ओबीसींचा : भाजपचा डीएनए ओबीसी आहे. भाजपचा प्राण ओबीसी, श्वास ओबीसी आहे. पक्ष सदैव ओबीसी समाजाच्या पाठीशी राहिली. ओबीसींचे काढून घेतले गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा भाजपने मिळवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून सत्तेत आल्यानंतर सब का साथ सब का विकास नारा देत सर्व समाजांना सोबत घेत विकासाचे राजकारण केले. काँग्रेसने ६०-७० वर्षांच्या सत्ताकाळात केवळ स्वतःचे कल्याण केले. मोदींनी १० वर्षांच्या काळात सामाजिक, वैयक्तिक लाभाच्या विविध विकासाच्या योजना राबवून सर्वसामान्यांना त्यांचा लाभ दिला. मोदी यांनीच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न जनतेला दाखविले असून, त्या दृष्टीने त्यांनी विकासाची पायाभरणी सुरू केली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपण सर्व ओबीसी समाजाने पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठविण्याची गरज आहे. येत्या २० मेस आपण सर्वांनी मित्रपरिवारासह खासदार डॉ. भामरे यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहनही श्री. गाते यांनी केले.
आता रोजगारनिर्मितीला प्राधान्य : डॉ. भामरे : उमेदवार तथा खासदार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक रोजगारनिर्मितीला चालना द्यायची आहे. धुळे मतदारसंघातही गेल्या १० वर्षांत सहा राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आणली आहे. तसेच धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाची कनेक्टिव्हिटी निर्माण होत आहे. उद्योगवाढीसाठी धुळे जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात यशस्वी ठरलो आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश झाला आहे. तसेच जिल्ह्यात कपाशीसह मका, बाजरी, गहू, ज्वारी आदी प्रमुख पिकांचे उत्पादन होत असल्याने टेक्स्टाइल पार्क, इथेनॉल निर्मितीसह फूड प्रोसेसिंगसारखे उद्योग आगामी तीन-चार वर्षांत उभारले जातील. यातून बेरोजगारांच्या हातालाही काम मिळण्यास मदत होणार आहे. विकासाची ही घोडदौड अशीच पुढे सुरू राहण्यासाठी आपण पुन्हा एकदा मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.
हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र येत लढा द्या : अग्रवाल : अनुप अग्रवाल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशविघातक शक्तींशी लढताना आपण हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत आपण लढाई लढू शकत नाही तसेच विजयी प्राप्त करू शकत नाही. यामुळे आपण आधी हिंदू आहोत आणि नंतर आपली जात आहे, याचे भान राखत, देशाप्रती आपला अभिमान बाळगत एकत्र या. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान आणि आपले लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा खासदार बनविण्यासाठी अधिकाधिक मतदान कसे होईल, यासाठी सतत प्रयत्न करा. इतरांनाही मतदानासाठी घराबाहेर काढा. भारताला तिसरी महाशक्ती बनविण्यासाठी डॉ. भामरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान पेलावे लागेल. त्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हा, असे आवाहनही श्री. अग्रवाल यांनी केले.
भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
आम्ही खासदार डॉ. भामरेंसोबत : मायादेवी परदेशीमाझ्यासह आमचा परदेशी परिवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार काही जणांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, आज ओबीसी सामाजिक संमेलनाच्या व्यासपीठावरून हा बिनबुडाचा आरोप असल्याचे जाहीरपणे सांगते. आम्ही परदेशी परिवार सतत डॉ. भामरे यांच्या पाठीशी आहोत आणि यापुढेही राहू. एवढेच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही भाजपच्या ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी यांनी दिली. डॉ. भामरे यांनी गेल्या १० वर्षांत मतदारसंघाचा विकासकामांतून कायापालट केला आहे. आता खासदार डॉ. भामरे यांनी मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न हाताळत जिल्ह्यात औद्योगिकरणाच्या विकासासाठीही प्रयत्नशील राहून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करताना तुमच्या विजयी हॅट्ट्रिकसाठी आम्ही रात्रीचा दिवस करू, अशी ग्वाहीही दिली.
हेही वाचा