धुळ्यातील भीमनगरात बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष
धुळे : धुळ्यातील भीमनगरात बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष सुरू झाला असून, विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे.
धुळे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळजवळ सर्वच भागांमध्ये मोठ्या हर्ष, उल्हास आणि आनंदात साजरी केली जात असते. यात प्रामुख्याने शहरातील साक्री रोडवरील भीम जयंतीचा उत्सव दरवर्षी संपूर्ण शहरासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा ठरत असतो. भीम नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून जयंती साजरी केली जात असते. त्यामुळे भीमनगरच्या जयंती उत्सवाची साऱ्यांनाच मोठी उत्सुकता असते. यावर्षी देखील भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती साजरी करण्यासह विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
भीमनगर येथील प्रवेशद्वार आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे, प्रवेशद्वाराशेजारी असलेले तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवर अत्यंत आकर्षक रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आल्याने पुतळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. याचबरोबर भीमनगर येथील साक्री रोड परिसर बाबासाहेबांच्या जयंतीच्या आकर्षक अशा शुभेच्छा बॅनरमुळे पूर्णपणे भिममय झाला आहे. बाबासाहेबांच्या विविध भाव मुद्रा ह्या शुभेच्छा बॅनरमधून ठळकपणे दिसून येत आहेत. प्रवेशद्वारासमोरच लावलेले माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, युवा नेते धनराज शिरसाठ, किरण ढिवरे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने लावण्यात आलेले भव्यदिव्य बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरच्या आकाराकडे पाहिल्यावर सहाजिकच बॅनर जवळून पाहावेसे वाटते. कारण या बॅनरवर बाबासाहेबांच्या प्रतिमेसह काही प्रतिमा या प्लायवूडच्या माध्यमातून बॅनर सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. हे या बॅनरचे वैशिष्ट्य आहे. तसेच साक्री रोडवरील दुभाजकांवर असलेल्या विद्युत दिव्यांना आकर्षक निळ्या वस्त्रांनी सजविण्यात आले आहे. तसेच पथदिव्यांना देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. एकंदरीतच संपूर्ण भीमनगर आणि साक्री रोड परिसर निळ्या रंगाने व्यापून टाकला आहे. भीम जयंतीचा उत्साह साऱ्यांमध्येच संचारला असून मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळ्यातील भीमनगरात बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष सुरू झाला असून, विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये प्रामुख्यानं महिला युवा नेत्या पूनमताई जितेंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री अंजनाआई उंदा शिरसाठ महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भीमनगर महिला भीमजयंती उत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. 10 एप्रिल रोजी या कार्यक्रमांना सुरुवात झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, युवा नेत्या पुनमताई शिरसाठ, माजी महापौर प्रतिभा चौधरी, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या अल्पा अग्रवाल, कुसुमताई शिरसाठ, नयना दामोदर, सरोजताई कदम, प्रमिला पाटील, वंदना सातपुते, उर्मिला पाटील, वैशाली आडखमोल यांच्यासह महिला मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी पाच ते अठरा वयोगटासाठी ग्रुप डान्स, 18 ते 35 वयोगटासाठी फॅशन शो, खुल्या वयोगटासाठी भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नऊ ते सोळा वयोगटासाठी नृत्य, आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी माता रमाई जीवन चरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महिलांविषयी भूमिका हे विषय होते. या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील मुली, विद्यार्थिनी आणि महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले. या सादरीकरणाला भीमनगरवासीयांसह प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेऊन वाहवा केली. तसेच दिनांक 11 एप्रिल रोजी मोठ्या वयोगटासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, ग्लास शो, टिकली शो, उखाणा घेणे! वन टू शो इत्यादी स्पर्धा झाल्या. बक्षीस वितरणासह सत्काराचा कार्यक्रम झाला.