शासनाची दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
धुळे : बनावट कागदपत्रे आणि खोट्या नोंदी घेऊन वेतन निश्चिती तसेच पेन्शन आणि ग्रॅज्युएटीची जास्तीची रक्कम मंजूर करीत शासनाची सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सोनगिरच्या आठ सेवानिवृत्त शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनगीर येथील सोनगीर विद्या प्रसारक संस्थेच्या एन. जी. बागुल हायस्कूलचे हे प्रकरण आहे.
गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे अशी : उपशिक्षिका सुनिता अमृतलाल चौधरी (रा. स्वामीनारायण रोड, दत्त मंदिर, देवपूर, धुळे), उपशिक्षिका श्रीमती भारती पंडितराव देशमुख (रा. बडगुजर कॉलनी, जीटीपी स्टॉप, देवपूर, धुळे), शिक्षक राजेंद्र मुरलीधर वाणी (रा. प्लॉट नंबर ९, मयूर अपार्टमेंट, तुळशीरामनगर, धुळे), लिपिक प्रकाश पूनमचंद गुजर (रा. सोनगीर, ता. धुळे), शिक्षक लोटन भटू चौधरी (रा. तेली गल्ली, सोनगीर), शिक्षक राजेंद्र पंडित चौधरी (रा. जानकीनगर, धनश्री अपार्टमेंट, देवपूर, धुळे), शिपाई दगडू शामराव बोरसे (रा. धनगर गल्ली, सोनगीर) आणि अमृत केशव कासार (तत्कालीन मुख्याध्यापक, रा. कासार गल्ली, सोनगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या कलमान्वये झाला गुन्हा दाखल : शासनाची आर्थिक फसवणूक केली म्हणून एन. जी. बागुल हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमकांत शंकर विसपुते (रा. शिवलीला, चंद्रभाननगर, करवंद नाका, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ शिक्षकांविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 465, 467, 466, 471 आणि 34 प्रमाणे 12 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण : मुख्याध्यापक हेमकांत विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोनगीर विद्या प्रसारक मंडळ सोनगीर मार्फत सन 1991 मध्ये विनाअनुदानित तत्त्वावर कन्या हायस्कूल सुरू करण्यात आले होते. कन्या हायस्कूलमध्ये एकूण सात कर्मचारी होते. त्यात उपशिक्षिका सुनीता अमृतलाल चौधरी, उपशिक्षिका भारती पंडितराव देशमुख, उपशिक्षक राजेंद्र मुरलीधर वाणी, लिपिक प्रकाश पूनमचंद गुजर, उपशिक्षक लोटन भटू चौधरी, उपशिक्षक राजेंद्र पंडित चौधरी, शिपाई दगडू शामराव बोरसे यांचा समावेश होता. कन्या हायस्कूलला सन 1995-96 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित तत्त्वावर एक वर्षासाठी मान्यता दिली होती. या शाळेतील वरील सात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फक्त एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात विनाअनुदानित तत्त्वावर नेमणुकीस मान्यता दिली होती. परंतु शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडून जून 1997 मध्ये कन्या शाळेची मान्यता काढून घेण्यात आली. विनाअनुदानित कन्या शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून कोणतेही वेतन, भत्ते अथवा आर्थिक लाभ देय नाहीत.
दरम्यान कन्या शाळेच्या वरील सात कर्मचाऱ्यांनी 31 मार्च 1998 रोजी धुळे येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचीकेवर सुनावणी होऊन 6 डिसेंबर 2001 रोजी दिवाणी न्यायालयाने निकाल दिला. या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2002 पासून सेवा जेष्ठतेनुसार सोनगीर विद्या प्रसारक मंडळ संचलित एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये समावेशन करण्यात यावे आणि वेतनाचे सर्व लाभ एक जानेवारी 2002 पासून देण्यात यावे असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यावेळी सोनगीर विद्या प्रसारक मंडळ येथे प्रशासकाची नेमणूक होती. त्यामुळे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नाशिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक धुळे आणि प्रशासक यांनी न्यायालयाच्या निकाला विरोधात 14 फेब्रुवारी 2002 रोजी धुळे येथील तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सदर अपीलाचा निकाल 27 ऑगस्ट 2004 रोजी लागला असून, त्यात अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. सदर निकालात देखील या सात कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2002 पासून सेवा जेष्ठतेनुसार सोनगीर विद्या प्रसारक मंडळ संचलित एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये समावेशन करण्यात यावे. परंतु त्यांची मागील थकीत वेतनाची मागणी अमान्य करून समावेशनापासून सेवाजेष्ठता व वेतनाचा लाभ त्यांना द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार कन्या हायस्कूलच्या या सात कर्मचाऱ्यांना सन 2004 पासून एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये टप्प्याटप्प्याने समावेशन करण्यात आले. परंतु समावेशान करताना देखील राजेंद्र मुरलीधर वाणी यांची सेवाजेष्ठता डावलून त्याऐवजी तत्कालीन मुख्याध्यापक अमृत केशव कासार यांनी बेजाबाबदारपणे श्रीमती सुनीता अमृतलाल चौधरी यांना सर्वप्रथम समावेशन करून घेतले. तत्कालीन मुख्याध्यापक अमृत कासार यांनी समावेशन झालेल्या वरील सात कर्मचाऱ्यांचे वेतन लेखा अधिकारी शिक्षण विभाग जि. प. धुळे यांच्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे सन 1991 पासून मानीव वेतन निश्चिती करून घेतली व अनुदानित तत्त्वावर समावेशन केल्यानंतर पूर्वलक्षित प्रभावाने वेतन अनुदान शासनाकडून प्राप्त करून घेतले. त्यानुसार समावेशनापासून ते आजपावेतो जास्तीचे वेतन घेत आहेत. त्याचप्रमाणे शांतीलाल मंगा चौधरी यांनी शिक्षण संस्थेच्या कामकाजात ढवळाढवळ करून वरील सात कर्मचाऱ्यांचे सर्व्हीस बुक आणि त्यातील सर्व नोंदी तसेच त्यांचे रुजू रिपोर्ट त्यांच्या हस्ताक्षरात लिहून घेतले आहेत.
तसेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी हेमकांत विसपुते यांना एन. जी. बागुल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक करण्यात आले. त्यावेळी सुनिता चौधरी यांनी हेमकांत विसपुते यांच्या मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीला आक्षेप घेऊन त्या सेवाजेष्ठ आहेत असे सांगून त्यांनी याप्रकरणी शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. धुळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन 18 ऑक्टोबर 2023 रोजी निकाल दिला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या निकालाच्या इतिवृत्ताचे अवलोकन केले असता, त्यात सुनिता चौधरी यांचा नियुक्ती दिनांक सात जून 1992 हा प्रथमदर्शनी दिसत असला तरी, त्यानंतर त्यांची सेवा खंडित झाली आहे. त्यांचा कायम अखंड सेवारंभ दिनांक हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्थेने एन. जी. बागुल हायस्कूल सोनगीर येथे त्यांना समायोजित करून घेतल्याचा दिनांक अर्थातच 25 मार्च 2004 हा आहे, असा निकाल शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
समावेशन झालेल्या कन्या हायस्कूलच्या सात कर्मचाऱ्यांपैकी राजेंद्र पंडित चौधरी हे दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. श्रीमती भारती पंडितराव देशमुख यांनी दिनांक 31 जुलै 2021 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच लोटन भटू चौधरी हे दिनांक 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. प्रकाश पूनमचंद गुजर हे दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. राजेंद्र मुरलीधर वाणी हे 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. राजेंद्र मुरलीधर वाणी यांच्या पेन्शन प्रस्तावावर हेमकांत विसपुते मुख्याध्यापक या नात्याने एक नोव्हेंबर 2023 रोजी स्वाक्षरी करीत असताना त्यांच्या पेन्शन प्रस्तावात त्यांना दोन रेकग्निशन सर्टिफिकेट दिसून आली. त्यापैकी एक रेकग्निशन सर्टिफिकेटवर मुख्याध्यापक म्हणून सुनीता चौधरी यांनी त्या मुख्याध्यापिका नसताना देखील स्वाक्षरी केलेली दिसली. तसेच सदर सर्टिफिकेटवर अनेक आक्षेपार्ह मुद्दे आढळून आले.
राजेंद्र मुरलीधर वाणी यांची उपशिक्षक म्हणून 28 नोव्हेंबर 1991 ते 23 मार्च 2004 अशी अखंडीत सेवा दाखविली आहे. परंतु कन्या शाळा बंद झाल्यापासून म्हणजेच सन 1997 पासून ते अतिरिक्त जिल्हा न्यायालय तीन यांचा निकाल लागेपर्यंत म्हणजेच दिनांक 27 ऑगस्ट 2004 पर्यंत राजेंद्र मुरलीधर वाणी यांच्या सेवेत खंड होता.
कन्या शाळा विनाअनुदानित असताना तिला अनुदानित दाखवण्यात आले आहे. परंतु सदर कन्या हायस्कूलला शिक्षण विभागाकडून कधीही अनुदान मिळालेले नाही. याचा परिणाम सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची अखंडित सेवा ही अनुदानित शाळेत झाल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली आहे.
राजेंद्र मुरलीधर वाणी यांची सेवा अखंडित दाखविल्यामुळे या कर्मचाऱ्याला मिळणारी पेन्शन, ग्रॅज्युईटी ही जास्तीची मिळणार आहे.
एक नोव्हेंबर 2023 रोजी सुनीता अमृतलाल चौधरी या मुख्याध्यापिका नसूनही त्यांनी रेकग्निशन सर्टिफिकेटवर मुख्याध्यापिका म्हणून स्वाक्षरी केलेली आहे.
तसेच यापूर्वी सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त झालेले राजेंद्र पंडित चौधरी, भारती पंडितराव देशमुख, लोटन भटू चौधरी, प्रकाश पूनमचंद गुजर यांच्या पेन्शन प्रस्तावाच्या रेकॉर्डला असलेल्या दुय्यम प्रति पाहिल्या असता, या कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव व रेकग्निशन सर्टिफिकेटवर वरील प्रमाणेच दिशाभूल करणारी व खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कन्या हायस्कूलमध्ये रुजू झाल्यापासून ते एन. जी. बागुल विद्यालयात समावेशन होईपर्यंतचा कालावधी हा खंडित न दाखविता अखंडित दाखवून त्याप्रमाणे जास्तीची पेन्शन व ग्रॅज्युईटी रक्कम मंजूर करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक हेमकांत विसपुते यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. वरील इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हेमकांत विसपुते यांना प्राधिकृत केल्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार या प्रकरणी हेमकांत विसपुते यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
सोनगीर विद्या प्रसारक संस्था संचलित कन्या हायस्कूलचे तत्कालीन कर्मचारी व सद्यस्थितीत एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये समावेशन झालेले कर्मचारी सुनीता अमृतलाल चौधरी, भारती पंडितराव देशमुख, राजेंद्र मुरलीधर वाणी, प्रकाश पूनमचंद गुजर, लोटन भटू चौधरी, राजेंद्र पंडित चौधरी, दगडू शामराव बोरसे आणि अमृत केशव कासार यांनी एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजे सन 2004 ते दिनांक एक नोव्हेंबर 2023 रोजी दरम्यान संगनमत करून खंडित सेवा कालावधी अमृत केशव कासार यांनी अखंडित सेवा दाखवून तसेच सेवापटात खोट्या नोंदी घेऊन सन 1991 पासून त्यांच्या मानीव वेतन निश्चिती करून पूर्वलक्षित प्रभावाने त्यांची जास्तीची वेतन निश्चिती करून घेतली.
तसेच सुनिता अमृतलाल चौधरी यांनी सेवानिवृत्त झालेल्या भारती पंडितराव देशमुख, राजेंद्र मुरलीधर वाणी, प्रकाश पूनमचंद गुजर, लोटन भटू चौधरी, राजेंद्र पंडित चौधरी या कर्मचाऱ्यांचे खोटे व बनावट पेन्शन प्रस्ताव तयार करून त्यांच्या पेन्शन प्रस्तावात खोटी माहिती देऊन तसेच पेन्शन प्रस्तावात बनावट व खोटे रेकग्निशन सर्टिफिकेट जोडून सुनिता अमृतलाल चौधरी या मुख्याध्यापिका नसताना मुख्याध्यापिका पदाचे खोटे व बनावट शिक्के तयार करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन तसेच ग्रॅज्युईटीची जास्तीची रक्कम शासनाकडून मंजूर करून घेऊन शासनाची सुमारे सव्वा ते दीड कोटीची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी फिर्याद हेमकांत विसपुते यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दिली आहे.