सांगवी पोलिसांनी साडेदहा लाखांच्या अफुसह पकडला 25 लाखांचा मुद्देमाल
धुळे : शिरपूर तालुक्यातील पळासनेर चेकपोस्ट जवळ सांगवी पोलिसांनी एक मालवाहू ट्रक पकडला असून, या ट्रकमधून लसूणच्या आड होणारी अफूची अवैध वाहतूक रोखली. साडेदहा लाखांच्या अफूसह साडे पंचवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ट्रक चालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडून शिरपूरकडे एका ट्रकमधून अफूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पळासनेर गावाजवळ लावलेल्या चेक पोस्टवर नाकाबंदी करून वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नाकाबंदी दरम्यान आर. जे. 09 जी. सी. 45 69 क्रमांकाचा ट्रक अडवून पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात लसूण आणि लसूणच्या आड अफूची सुकलेली बोंडे आढळून आली. मानवी मेंदूस परिणाम करणारी आणि प्रतिबंधित असलेली ही अफूची बोंडे 52 किलो वजनाची असून, त्यांची किंमत दहा लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासोबतच 15 लाख रुपये किमतीचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी ट्रकचालक सलामुद्दीन निजामुद्दीन (वय 42, रा. दमाखेडी, ता. सितामऊ, जि. मंदसोर, मध्यप्रदेश) आणि ट्रक क्लिनर अशोक जगदिश चव्हाण (वय 30, रा. मानंदखेडा, ता. जावरा, जि. रतलाम, मध्यप्रदेश) या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, कृष्णा पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रफिक मुल्ला, जयराज शिंदे, हवलदार संतोष पाटील, ठाकरे, प्रवीण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, भूषण पाटील, रणजीत वळवी यांच्या पथकाने केली.