भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला नाही! डॉ. सुभाष भामरेंचे स्पष्टीकरण
धुळे : नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील दाभाडी येथे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करीत, उलट लबाडांचा उद्योग उघडा पडल्याची टिका धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी माजी आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता केली.
दाभाडी येथे परवा झालेल्या तिसऱ्या आघाडीच्या चिंतन बैठकीत राडा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना चोप दिल्याची माहिती लोकसंग्राम पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. यासोबतच त्यांनी एक व्हीडिओ क्लिप देखील व्हायरल केला होता. दरम्यान, धुळे शहरात बुधवारी भाजपच्या प्रचार कार्यालय शुभारंभ प्रसंगी याबाबत खुलासा करताना डॉ. भामरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
डॉ. भामरे म्हणाले की, ही चुकीची बातमी पेरण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण अजिबात झाली नाही. उलट या प्रकारामुळे या लबाडांचा उद्योग उघडा पडला. मुळात गुजरातमध्ये भाजपाच्या एका नेत्याने संबोधन करताना काहीतरी वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मला निश्चित माहिती नाही. परंतु करणी सेना नाराज आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी करणी सेनाने हा कार्यक्रम केला होता, असं दाखवण्यात आलं. त्याच्यात ही लबाड मंडळी घुसली. करणी सेनेचा विषय बाजूला करून स्वतःचाच उल्लू साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हे पळून गेले. भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा कोणताही प्रकार घडला नाही, असे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.
मोदी साहेबांच्या विरोधात कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी आम्ही त्याकडे लक्ष देत नाही आणि जनताही लक्ष देत नाही, असे चोख प्रतिउत्तरही डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.
हेही वाचा
येथे क्लिक करा आणि ती Video Clip पाहा
धुळे लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी, राडा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना चोप