अब की बार ४०० पारचा संकल्प तडीस नेऊया : खासदार डॉ. भामरे
धुळे : राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा केंद्रात सरकार स्थापनेचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आपण महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी सज्ज व्हायचे आहे. यावेळी अब की बार ४०० पारचा नारा प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपापल्या भागातील अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करा. आपल्या नेत्यांनी दिलेला आदेश- शब्द आपल्यासाठी सर्वोपरी आहे. प्रचाराचे नियोजन करताना घटक पक्षाच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामावून घेताना काही उणिवा, त्रुटी राहत असतील, तर त्या निदर्शनास आणून द्या. माझा उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला दाखल करायचा याची तारीख महायुतीच्या सर्व नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लवकरच सांगितली जाईल. त्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहून रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.
भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीच्या धुळे महानगर लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज येथील पारोळा रोडवरील गल्ली क्रमांक पाचमधील सुवर्णकार भवनात झाले, त्यावेळी खासदार डॉ. भामरे बोलत होते. भाजपचे धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, शिवसेनेचे महानगर जिल्हाप्रमुख सतीश महाले व मनोज मोरे, संजय वाल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, सुमित पवार, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, आरपीआयचे शशिकांत वाघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय सोनवणे, ॲड. प्रसाद देशमुख, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉ. माधुरी बोरसे, भाजपचे ज्येष्ठ नेते रवी बेलपाठक, हिरामण गवळी, संजय बोरसे, उषाबाई साळुंखे, भिकन वराडे, नरेश चौधरी, आकाश परदेशी, ओम खंडेलवाल यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कदमबांडे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचे आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करतानाच आपल्या धुळे मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पही आपण पूर्ततेस नेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
सतीश महाले म्हणाले, की महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार आपणही आपल्या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. भामरे यांनाही तिसऱ्यांदा गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करूया. सुमित पवार म्हणाले, की भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार डॉ. सुभाष भामरेंचे नाव जाहीर होऊन एक महिना झाला आहे. या महिनाभरात आपण सर्वांनी आपल्या परीने त्यांच्या विजयाचे आवाहन करत आलो आहोत. यावेळीही जनतेचा आशीर्वाद आपल्यालाच मिळणार आहे, याची खात्री बाळगा. आता फक्त मताधिक्य कसे वाढवता येईल, याचा विचार करून त्यादृष्टीने नियोजन करत कामाला लागूया.
अनुप अग्रवाल म्हणाले, की महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. भामरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २७ एप्रिलला होईल. त्याचे ठिकाण व वेळ उद्यापर्यंत निश्चित केले जाऊन ते सर्वांना कळविले जाईल. खासदार डॉ. भामरे हेही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख दोन दिवसांत कळवतील. त्यानुसार आपण सर्वांनी काटेकोर नियोजन करत शहरातून मताधिक्य वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी शक्ती केंद्रस्तरावर नमो संवादासह कॉर्नर सभा घेतल्या जातील. यावेळी आपापल्या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसे उपस्थित राहतील याचे नियोजन करायचे आहे.
हेही वाचा