लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ओळखपत्राचे हे 12 पुरावे ग्राह्य धरणार
धुळे : आगामी लोकसभा निवडणूक 2024 करिता होणाऱ्या मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी गोयल यांनी म्हटले आहे, आगामी लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीकरीता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करावे. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत, अशा मतदारांना त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. त्यात आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड ) , बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, पारपत्र (Passport), वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वत:चे छायाचित्र असलेले नोकरी ओळखपत्र, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र यांचा समावेश असेल.
मतदारांनी मतदान करतांना ओळख पटविण्यासाठी आपले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा