धनगर समाजबांधवांच्या मेळाव्यात खासदार डॉ. भामरेंचा काँग्रेसवर घणाघात
धुळे : ज्या काँग्रेसवाल्यांनी अक्कलपाडा प्रकल्पावर तब्बल ४० वर्षे राजकारण करत जनतेला पाण्यावाचून झुलवत ठेवले, ती काँग्रेस आमच्यावर निष्क्रियतेचा आरोप करतानाच अक्कलपाडाच्या पाण्यावरून धुळे तालुक्यातील गावागावांत अपप्रचार करत फिरत आहे. आम्ही निष्क्रिय असतो, तर अवघ्या पाच वर्षांच्या काळात अक्कलपाडा प्रकल्पाहून तिप्पट क्षमतेचे २५०० कोटी रुपयांच्या निधीतून जामफळ धरणाचे काम पूर्णत्वास आले नसते. आता येत्या वर्ष-दीड वर्षात तापीचे पाणी धुळे तालुक्यातील १०० व शिंदखेडा तालुक्यातील १०० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये खेळेल. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असा घणाघात लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अपप्रचारावर केला.
धनगर समाजाचा मेळावा झाला, त्यात खासदार डॉ. भामरे बोलत होते. आमदार जयकुमार रावल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, रितेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, किशोर हालोर, भाजपचे तालुका सरचिटणीस शरद पाटील, हरीश शेलार, पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, धनगर समाजाचे नेते सुनील वाघ, गोपाळ माने, श्री. नंदाळे सर, पंडित अण्णा मदने, दादाभाऊ पाटील, गोरख पाटील, प्रकाश पाटील, अप्पादादा बागले, समाधान ठोंबरे, अनिल पाकळे, सागर पाकळे, चुडामण पद्मोर, छोटू मासोळे, सोपान पाटील, विनोद खेमनार, शांताराम माऊली, हिरामण शिरोळे, पिंटू धनगर, रतिलाल पाटील, राजेंद्र भामरे, आधार खांडेकर, बिपीन पाकळे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यास धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, बागलाण या विधानसभा मतदारसंघातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की राज्यात व केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न झाला. धनगर समाजबांधवांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी १००० कोटींचे पॅकेजही देण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देव-देश आणि धर्मासाठीच वेचले. त्यांच्याच आदर्श घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देव-देश आणि धर्मासाठी देशविघातक शक्तींचा बीमोड करण्याचे ध्येय ठेवले आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची देशाला गरज आहे. यामुळे या निवडणुकीत कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता स्वतःसह आपला परिवाराला, आप्तेष्टांना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा.
आमदार रावल म्हणाले, की भारतीय जनता पक्षात राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य देण्याची शिकवण दिली जाते. याचाच परिपाक म्हणजे आज मी आमदार म्हणून कार्यरत असताना मतदारसंघातील धनगर समाजबांधवांसह बारा बलुतेदार म्हणवल्या जाणाऱ्या सर्वच समाजांची साथ आहे. यामुळेच सहकार क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा समाजांतील होतकरू तरुणांना लोकप्रतिनिधित्वाची संधी देण्याचे काम केले जात आहे. मात्र, काँग्रेसच्या ७० वर्षांच्या काळात बारा बलुतेदारांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. जेणेकरून हे बारा बलुतेदार आपल्या हुकमाचे ताबेदार राहतील. मात्र, भाजपने या मागास समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
पर्यटनमंत्री असताना चोंडी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी ५ कोटींचा निधी दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या विकासासाठी शासनाने विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेलाही मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. भाजप सरकारने समाजाला न्याय देताना आरक्षणाची संधी दिली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केली. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे, तर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. काँग्रेस आघाडी सरकारने सर्वसामान्यांना योजनांपासून वंचित ठेवण्याचे पातक केले. एवढेच नव्हे, तर जनतेला भडकवण्याचे, अपप्रचार करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. आज येथे उपस्थित समाजबांधवांनी आपल्या बांधवांना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करावे, २० मेस खासदार डॉ. सुभाष भामरे यांना अधिकाधिक मतदान करून विजयी करण्यासाठी पर्यायाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मेळाव्यामध्ये धनगर समाजबांधवांतर्फे पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, धनगर समाजाचे नेते सुनील वाघ, बागलाणचे नेते श्री. नंदाळे यांनीही मार्गदर्शन करत समाजाच्या मागण्या मांडल्या. तसेच समाजबांधवांनी कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही केले.
प्रचारासाठी मुद्देच नसल्याने विरोधकांकडून केवळ आरोप : डॉ. भामरेखासदार डॉ. भामरे म्हणाले, की गेल्या १० वर्षांत एकही ठोस काम केले नाही, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारखे कुठलेच मुद्दे नसल्याने जनतेची दिशाभूल केली जात आहे. आपण गेल्या १० वर्षांत २५०० कोटींतून सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा योजनेसह बागलाणमधील ४० वर्षे प्रलंबित ७ सिंचन कालव्यांचा प्रश्न निकाली काढला. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाचे काम सुरू केले. धुळे जिल्ह्यातून सहा नवीन राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले. अक्कलपाडा प्रकल्पाच्या शेवटच्या कामासाठीही ५०० कोटी रुपये मीच केंद्राकडून आणले, तेव्हा तो प्रकल्प पूर्णत्वास आला. आता हा प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठीही राज्याकडून १०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, येत्या सहा महिन्यांत बुडिताखाली येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करत प्रकल्पात १०० टक्के जलसाठा केला जाईल व लाभक्षेत्रातील सर्वच गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न निकाली निघेल. संपूर्ण मतदारसंघातील गावागावांत जलजीवन मिशनअंतर्गत पेयजल योजनांची कामे सुरू आहेत. गावांपासून मुख्य मार्गांना व मुख्य मार्गांपासून महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करून सुलभ दळणवळणाची सुविधा केली. गावागावांत रस्ते, सभामंडपाची कामे केली. धुळे शहरासाठी अक्कलपाडा प्रकल्पावरून पाणी योजना, भूमिगत गटार योजना राबविली. ही कामे विरोधक खासगीतही मान्य करतात. मात्र, सार्वजनिकरीत्या त्यांनी ती मान्य केली, तर त्यांचे राजकारणच संपुष्टात येण्याची भीती असल्याने ते अपप्रचार करत आहेत, असा घणाघातही खासदार डॉ. भामरेंनी केला.