ठिकठिकाणच्या भंडाऱ्यांना भेटी देत महाप्रसादाचे केले वाटप
धुळे : चैत्र पौर्णिमेनिमित्त वणी गडावरील सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या व परतणाऱ्या मातेच्या भक्तांशी संवाद साधत लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी (ता. २०) रात्री ठिकठिकाणच्या भंडाऱ्यांना भेटी देत श्रद्धाळू भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
चैत्र पौर्णिमेनिमित्त दर वर्षी खान्देशची माहेरवाशीण असलेल्या वणी येथील गडावरील सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी खान्देशातील विविध गावांतून पायी दिंडी काढत लाखो भाविक जात असतात. या भाविकांमध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. चैत्रातील अगदी कडाक्याच्या उन्हातही पदयात्रेने गडावर जाणाऱ्या भाविकांमध्ये अतोनात उत्साह पाहायला मिळतो. मजल-दरमजल करत हे भाविक मार्गस्थ होत असतात. मातेच्या या भाविकांसाठी पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी अनेक सामाजिक संस्था, संघटना व दानशूरांतर्फे चहा, नाश्ता, पाणी, उसाचा रस, महाप्रसाद व भंडाऱ्यांचे स्टॉल लावलेले असतात. तेथे थांबून सर्व भाविक आपली क्षुधा भागवतात व काही वेळ आराम करून आपली पदयात्रा पुढे सुरू ठेवतात. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी सायंकाळी कळवण ते धुळ्यापर्यंतच्या ठिकठिकाणच्या भंडाऱ्यांना भेटी देत तेथे जमलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली. तसेच भंडाऱ्यांचे आयोजन करत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या सामाजिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी व सेवकांशीही चर्चा करत त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी सप्तशृंगीमातेच्या भक्तांसह सामाजिक संस्था-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबा माता की जय’, चलो बुलावा आया है माता ने बुलाया है आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी, मंडळाध्यक्ष बबनराव चौधरी, पंकज धात्रक, सचिन पाटील, निलेश नेमाने ,नरेश हिरे, भूषण गवळी, वैभव कासार आदींनी देवीमातेच्या विविध भक्तिगीतांवर नृत्याचा ठेकाही धरला.