धुळे एसआरपीएफच्या सहायक समादेशकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
धुळे : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाचे सहायक समादेशक तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. धुळे एसीबीच्या पथकाने 22 एप्रिल रोजी चंद्रकांत पारसकर यांच्या निवासस्थानातच हा सापळा यशस्वी केला.
या प्रकरणातील तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. दलातील तक्रारदार यांच्यासह इतर पाच नर्सिंग ऑफिसर महिला 14 आणि 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होत्या. चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा मागितला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून घेतले आणि गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये जमा करून आणून देण्याचे सांगितले. पैसे दिले नाहीत तर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना धमकावले होते. परंतु लाच देण्याचे काम करण्याची तक्रारदार यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी 20 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात स्वतः येऊन तक्रार दिली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची 20 एप्रिल रोजी पडताळणी केली असता, चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांच्याकडे गैरहजर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान स्पष्ट झाले. सदर रक्कम स्वीकारताना त्यांना 22 एप्रिल रोजी त्यांच्या धुळे येथील नकाने रोडवरील एसआरपी कॉलनीतील राहत्या घरात रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याची शंका आल्याने चंद्रकांत पारसकर यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुतपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी नाशिक प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.