महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात आदिवासी न्याय मेळावा
धुळे : आदिवासी समाज हाच देशाचा मूळ मालक असल्याचे खासदार राहुल गांधी सांगत आहेत. मात्र सत्ताधारी भाजप आदिवासी समाजाला वनवासी ठरवून नष्ट करू पाहत आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अमानुष अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र खा. राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जाऊन आदिवासी बांधवांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला. संसद भवनाचे उद्घाटन, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रोपदी मुरूम या आदिवासी असल्याने त्यांना बोलाविले नाही. आदिवासी समाजाचे अस्तित्व संपविणाऱ्या आणि पावलोपावली आदिवासी बांधवांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असा हल्लाबोल काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात केला.
धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात 23 एप्रिल रोजी हिरे भवनात धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदार संघातील आदिवासी बांधवांचा धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आदिवासी न्याय मिळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी खासदार बापू चौरे, शिवसेना संपर्कप्रमुख अशोक धात्रक, माजी आमदार शरद आहेर, माजी आमदार प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, डॉ. सुशील महाजन, शुभांगी पाटील, जोसेफ मलबारी, रणजीत भोसले, प्रथम महापौर भगवान करनकाळ, किरण जोंधळे, महेश मिस्त्री यांच्यासह महाविकास व इंडिया आघाडीचे नेते आणि आदिवासी समाजातील नेते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्योत्तर काळानंतर आदिवासी समाजाने राजकारणात नेहमीच भक्कम अशी साथ दिली असून, आदिवासी समाजाशी काॅंग्रेसशी अतूट नाते निर्माण झाले आहे. ते कधीही तुटू शकत नाही. याच नात्याची बांधिलकी जपत महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देत संसदेत आपला हक्काचा खासदार पाठवावा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
आमदार कुणाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या धुळ्यातीलच असून, एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना धुळे लोकसभेच्या रणमैदानात उतरविले आहे. डॉ. शोभा बच्छाव यांना थेटपणे खासदारकीचे तिकीट मिळालेले नाही तर त्यामागे त्यांचा मोठा राजकीय प्रदीर्घ असा प्रवास कारणीभूत आहे. तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव सभापती झाल्या. त्यानंतर आमदार झाल्या. त्यानंतर मंत्रीही झाल्या. आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनी भूषविले आणि आता धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही त्यांची प्रचंड असलेली क्षमता पाहूनच मिळालेली आहे. डॉ. शोभा बच्छाव यांना कामकाजाचा मोठा अनुभव आहे. विकासकामे करण्यात त्यांचा मोठा अनुभव राहिला आहे. हाच अनुभव धुळे लोकसभेच्या मतदारसंघात विकासकामांना चालना देण्यासाठी कामात येईल. डॉ. शोभा बच्छाव यांच्या पाठीशी आदिवासी समाज भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांवर भाष्य केले. आदिवासी समाजजीवन, लोकसंस्कृती जपण्यासाठी, आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्याच्या सुरुवातीला राजकुमार सोनवणे यांच्यासह अन्य आदिवासी समाजाच्या नेतेमंडळींची भाषणे झाली.