बाबासाहेबांच्या मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लावा : विवेक विचार मंचची पत्रपरिषदेत मागणी
धुळे : दाेंडाईचा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर एका समुदायातील काही जणांकडून दगडफेक करण्यात आली. संबंधिताकडून शहरातील प्रत्येक मिरवणूकीला विराेध केला जाताे. या घटनेची एसआयटीतर्फे चाैकशी करण्यात यावी, त्यातील आराेपीवर याेग्य कलमाखाली गुन्हे दाखल करून माेक्का कायद्यातंर्गत कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील मुळ फिर्यादी गाेविंदा गुलाब नगराळे आणि विवेक विचार मंचाचे विभाग संयोजक जयेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात २३ एप्रिल रोजी झालेल्या या पत्रपरिषदेला विवेक विचार मंचाचे जिल्हा संयोजक ॲड. निखिल भावसार, कांतीलाल मोहिते, वर्षा बिऱ्हाडे, सुनीता नगराळे, बायजाबाई आखाडे, अधिवक्ता परिषदेचे ॲड. निखिल वडनेरे उपस्थित होते.
पत्रपरिषदेत माहिती देताना जयेश चौधरी व गोविंदा नगराळे म्हणाले की, डाॅ.आंबेडकर जयंती दाेंडाईचा शहरात माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक एका प्रार्थना स्थळाजवळून जात असताना एका समुदायातील काहींनी त्या भागातून मिरवणूक काढण्यास विराेध केला. यावेळी किरकाेळ वादही झाला. वाद मिटल्यानंतर मिरवणूक पुढे जात असताना काहींनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही समाजबांधव आणि महिलांसह सहायक पाेलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती व सण, उत्साह असल्याने याप्रसंगी समाजबांधव काहीही बाेलले नाहीत. मात्र शहरातील काेणत्याही कार्यक्रमाची मिरवणूक या मार्गावरून काढण्यास संबंधितांकडून विराेध केला जाताे. आमदारांच्या गणपती मिरवणूकीलाही विराेध केला गेला हाेता. तसेच साध्या लग्नाच्या मंडपाची मिरवणूकही या भागातून काढण्यास संबंधितांचा विराेध असताे. यामुळे याबाबत पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही सर्व संशयितांना अटक झालेली नाही.
संबंधितांकडून नेहमीच असे प्रकार केले जातात. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी, पाेलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात या घटनेचा सखाेल तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपास पथक स्थापन करावे, संबंधित संशयितांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्याविरूध्द माेक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच संबंधित आराेपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
दोंडाईचात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांनी हल्ल्यादरम्यान रासायनिक स्प्रेचा वापर केला होता, असा दावाही पत्रपरिषदेत करण्यात आला. शांतता कमिटीच्या बैठकाही होतात. मात्र सदर ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात. यामुळे पोलिसांनी कोणतीही आवश्यक खबरदारी घेऊन पुरेसा बंदोबस्त ठेवला असता व संबंधित संशयित हल्लेखोरांना अगोदरच ताब्यात घेतले असते तर हा प्रकारच घडला नसता असेही चौधरी, नगराळे यांनी नमूद केले.