पंतप्रधान मोदींबरोबरच डॉ. सुभाष भामरेंच्या विजयाचाही विक्रम करणार : मदनलाल मिश्रा
धुळे : लोकसभेची या वेळी होत असलेली निवडणूक विविध अंगांनी महत्त्वाची असून, ही दोन पक्षांमधील किंवा अनेक पक्षांमधील लढाई नव्हे, तर ही विचारांची लढाई आहे. एका बाजूला राष्ट्र प्रथम असे म्हणत संपूर्ण जगात देशाचा डंका वाजविणारे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे, तर दुसरीकडे देशाचे तुकडे करण्याची मनीषा बाळगणाऱ्या प्रवृत्ती उभ्या आहेत. यामुळे आपण कोणासोबत जायचे, कोणता विचार स्वीकारायचा, हे ठरविण्याची वेळ आली आहे. याच मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे कर्तृत्ववान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाचा तिसऱ्यांदा विक्रम करण्यासाठी आपण सज्ज आहोत अशी ग्वाही देऊया, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे सोमवारी (ता. २२) सायंकाळी येथील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा झाला, त्यात श्री. मिश्रा बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक अध्यक्षस्थानी होते, तर खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, धुळे लोकसभेचे संयोजक राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेलपाठक, जगदीश झांजरिया, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, महामंत्री जितेंद्र चौवटिया, यशवंत येवलेकर, प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, भाजयुमोचे आकाश परदेशी, माजी नगरसेवक अमोल मासुळे, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे पदाधिकारी डॉ. श्रीराम भतवाल, प्राचार्य व्ही. के. भदाणे, ॲड. चंद्रकांत जावळे, सुनील देवरे, कमलाकर पाटील, प्रकाश पाटील, नंदू ठोंबरे, डॉ. सुलभा कुवर, उषा कुलकर्णी, स्मिता पाटील, लताबाई चौधरी, संतोष खंडेलवाल, शरद बिरारी, सुभाष सोनवणे, आनंदा चौधरी, सुधीर पोतदार, वाणी, विलास पाटील, युवराज बोरसे, राजेंद्र मोरे, दिनेश बडगुजर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
विकसित भारताच्या संकल्पाला पाठिंबा द्या : लक्ष्मण सावजी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एका नव्या उत्क्रांतीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आर्थिक महासत्तेच्या दिशेने त्याची वाटचाल दिवसेंदिवस भक्कम होत आहे. यामध्ये देशातील प्रत्येक घटकाचा सहभाग आहे. आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिकांचाही त्यात समावेश आहे. आपण स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला. स्वातंत्र्यानंतर साजरा झालेला रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सवही पाहिला. नुकताच झालेला अमृतमहोत्सवही अनुभवला. पूर्वीच्या आणि आताच्या भारतात जमीन-आस्मानाचा फरक जाणवेल. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे भारत जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश बनला आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी यावेळीही त्यांना भरभरून पाठिंबा द्यावा, लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहनही श्री. सावजी यांनी केले.
नरेंद्र मोदींचे नेतृत्व कणखर : प्रकाश पाठक म्हणाले, की यावेळी होत असलेली निवडणूक देशहिताच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. ही लढाई दोन पक्षांमधील किंवा वेगवेगळ्या पक्षांशीही नाही. ही विचारांची लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे जर निरीक्षण केले, तर त्यांच्या कामाचा पहिला केंद्रबिंदू राष्ट्र प्रथम हा राहिला आहे. भाजपचेही धोरण पहिले राष्ट्र आणि मग पक्ष असे राहिले आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत केलेल्या कामातून जगाच्या नकाशावर भारताचे महत्त्व अनेक दृष्टींनी अधोरेखित केले आहे. परराष्ट्रीय धोरणातून जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे भारतात होणारे दहशतवादी हल्ले थांबले. सीमारेषेवर होणारी घुसखोरी थांबली. जम्मू-काश्मीरमध्ये आता विकासाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या ७० वर्षांनंतर बदललेल्या या परिस्थितीमुळे तेथील जनताही खूश आहे.
गाफील न राहता मतदानासाठी बाहेर पडा : पाठक म्हणाले, की भारत आर्थिकदृष्ट्या पाचवी महासत्ता बनला असून, दोन वर्षांत तो तिसऱ्या क्रमांकावर येईल. भारतातील वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे उद्योग क्षेत्रात भारत आघाडीवर गेला आहे. संरक्षण क्षेत्रात आपली सज्जता वाढली असून, आज आपण शस्र् व तंत्रज्ञानाचे निर्यातदार बनलो आहोत. देशातील प्रत्येक नागरिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी ते झटत आहेत. देशाची संस्कृती टिकविण्याचे त्यांचे धोरण आहे. यातूनच सब का साथ-सब का विकास हा विचार पुढे आला आहे. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व हे स्पष्ट, स्वच्छ, निस्पृह, निर्भय आणि निःस्वार्थ आहे. हा देश मोठा व्हावा, या पलीकडे कोणतीही आकांक्षा नाही. समृद्ध, सक्षम आणि समरस भारताचा उदय झाला आहे. समाजाला कर्तव्याभिमुख न्यायचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यामुळे गाफील राहू नका. देशाला गतवैभव मिळवून देण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी केंद्रांपर्यंत पोहोचायचे आहे आणि भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयात त्याचे रूपांतर करायचे आहे, असे आवाहनही श्री. पाठक यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. हिरामण गवळी, जगदीश झांजरिया, प्राचार्य व्ही. के. भदाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर ऊहापोह केला. अनुप अग्रवाल यांनी आभार मानताना मतदान करण्याबाबत कुणीही गाफील राहू नये. गेल्या वेळी कमी मतदान झाले होते. यावेळी त्याची भरपाई करताना अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी केंद्रांपर्यंत पोहोचावे. आपल्या घरातील परिसरातील मतदारांना त्यासाठी उद्युक्त करा, असे आवाहन केले.
तिसऱ्यांदा विक्रमासाठी वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावा : डॉ. भामरे
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की तिसरा विक्रम तुम्हा ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात भारताने विविध क्षेत्रांत भरारी घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा दरारा निर्माण केला आहे. भारत आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून, पुढील दोन वर्षांत जगातील तिसरी महासत्ता बनलेला असेल. पंतप्रधान मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न, संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हा-आम्हाला या निवडणुकीत काम करण्याची गरज आहे आणि ती येत्या २० मेस होणाऱ्या पवित्र मतदानाच्या कार्यातून ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. गेल्या १० वर्षांत खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदी यांचे कार्य अगदी जवळून पाहता आले. त्यांना समजून घेता आले. देव, देश आणि धर्मासाठीच वाहून घेतलेल्या या तपस्वीने राष्ट्रहितासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची झालेली संरक्षण सज्जता न भूतो न भविष्यती आहे. हा विकासाचा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी येत्या २० मेस कमळ चिन्हाचे बटण दाबून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अधिकाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहन करताना ज्येष्ठांचे जेही प्रश्न असतील ते टप्प्याटप्प्याने सोडविण्याची ग्वाहीही डॉ. भामरे यांनी दिली.