पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना पकताच नागरिकांनी केली ‘पोलिसवाला गुंडा’ म्हणून घोषणाबाजी
नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना 50 हजारांची लाच घेताना पकडताच नागरिकांनी ‘पोलिसवाला गुंडा’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता ताब्यात घेतले. कारवाईनंतर पोलिस निरीक्षक वारे यांच्याविरोधात रोष व्यक्त करत जमावाने लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या गाडीवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.
काय आहे नेमकं प्रकरण : गुजरात राज्यातील एका आरोपीवर दाखल असलेल्या गुदन्ह्यात त्याला अटक न करण्यासाठी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन लाखाची रक्कम निश्चित करण्यात आली आणि एक लाख रुपये देण्यात आले होते. बुधवारी यातील ५० हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हजर झाला होता. तत्पूर्वी तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असल्याने ‘पथक घटनास्थळी हजर झाले होते. तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर पथकाने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहाथ अटक केली.
नागरिक म्हणाले आमच्या ताब्यात द्या : ज्ञानेश्वर वारे यांच्या अटकेची माहिती नवापुरात वाऱ्यासारखी पसरली होती. यातून शेकडोंचा जमाव पोलिस ठाणे परिसरात जमला होता. यावेळी त्यांच्याकडून ‘पोलिस निरीक्षक वारे हे खोट्या केसेसमध्ये अडकवून छळ करतात’, असे एसीबीच्या पथकाला सांगण्यात आले. यामुळे पोलिस निरीक्षकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांकडून पोलिस निरीक्षक वारे याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
एसीबीच्या वाहनावर दगडफेक : यादरम्यान काहींकडून एसीबीचे वाहन आणि पोलिस गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. जमावाकडून संबधित ‘पोलिस निरीक्षक हे भ्रष्ट अधिकारी आहेत’, ‘निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल ‘ करतात” असे आरोप करून घोषणाबाजी केली जात होती. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचारी आणि नवापूर शहरातीरल ज्येष्ठ नागरिक तसेच माजी लोकप्रतिनिधींनी भेटी देत नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना घराकडे पाठवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.