कर्नाटकातील काॅंग्रेस नेत्याच्या मुलीच्या हत्याकांडाचे धुळ्यात पडसाद
धुळे : कर्नाटक राज्यातील हुबळी येथे नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी लिंगायत गवळी समाजाने एकत्र येत जोरदार निदर्शने केली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात हुबळी येथे नेहा हिरेमठ या भगिनीची धर्मांध युवक फय्याज याने एकतर्फी प्रेमातुन कॉलेजच्या आवारात निर्घृण हत्या केली. या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करतो. या आरोपीला फाशीची शिक्षा देवून नेहा हिरेमठ या तरुणीला न्याय मिळावा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. अन्यथा लिंगायत समाजास रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागतील, असा इशारा दिला. निवेदन देताना वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष राकेश गादगे, किशोर मोगलाईकर, चंद्रकांत जैतपूर, दिनेश लिंगायत, रामेश्वर साबरे, तेजस दुधे, प्रभाकर लद्दे, चंद्रशेखर बनछोड, विजय गुळवे, किरण गुळवे, संदीप लिंगायत, राजु गादगे, दीपक लोहारकर, महेश महिमाने, संगिता बनछोडे, सुवर्णा गादगे, पल्लवी दुडे, मंजुषा लिंगायत, कोमल गादगे आदी उपस्थित होते.
काय आहे प्रकरण : महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू आहेत. 18 एप्रिल 2024 दुपारी 4.45 वाजता 24 वर्षीय एमसीएची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ परीक्षेसाठी कॉलेजमध्ये आली होती. परीक्षा दिल्यानंतर ती लगेच परीक्षा केंद्रातून बाहेर पडली. त्यानंतर तिनं आईशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर आरोपीनं नेहा हिरेमठशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, कदाचित नेहा हिरेमठ संवाद साधायला तयार नव्हती, असं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. या गोंधळात आरोपीनं खिशातून चाकू काढत नेहा हिरेमठवर सपासप वार केले.
Hubli Murder Case : कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील विद्यानगरमध्ये घडलेल्या नेहा हिरेमठ हत्या प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हे हत्या प्रकरण लव्ह जिहादचं असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली. दोषीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबानं केलीय. नेहा हिरेमठ कुटुंबीयांनी सांगितलं की, “आमच्या मुलीसोबत जे घडलं, ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये. गरज भासल्यास सरकारनं यासाठी कायदा करावा. तसंच आरोपी फैयाजची चौकशी करून यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करावा.”
दोघांचंही एकामेकांवर प्रेम? : दुसरीकडं, आरोपीच्या आईनं लव्ह जिहाद प्रकरणाला स्पष्टपणे नकार दिलाय. संशयित आरोपीची आई म्हणाली की, “नेहा हिरेमठ तसंच फैयाज यांचं एकमेकांवर प्रेम होतं. माझ्या मुलाच्या वतीनं मी कर्नाटकातील सर्व लोकांची माफी मागते. मी मुलीच्या पालकांचीही माफी मागते. ती माझ्या मुलीसारखी होती. त्याच्या कुटुंबाप्रमाणेच मीही दु:खी आहे. माझ्या मुलानं जे केलं ते चुकीचं आहे. यासाठी त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या कृत्यामुळं आमची मान शरमेनं झुकवली आहे. घरी बसण्याचा कंटाळा आल्याचं सांगून तो 13 एप्रिलला घरातून निघून गेला होता.”
मुलाच्या कृत्यामुळं मान शरमेनं झुकली : “नेहा चांगली मुलगी होती. फैयाज तसंच नेहा केवळ चांगले मित्रच नव्हते, तर एकमेकांवर प्रेमही करत होते. हे मला गेल्या एक वर्षापासून माहीत होतं. त्यांचं एकतर्फी प्रेम नव्हतं. माझा मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होता. पण मी त्याला आधी करिअरवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं. तो अभ्यासात खूप हुशार आहे. नेहाही हुशार होती. दोघांनीही आयएएसची तयारी करावी अशी, माझी इच्छा होती. पण त्यानं माझी मान शरमेनं झुकवली आहे. त्यानं केलेल्या कृत्याचं फळ त्याला भोगावं लागणार आहे. मी आई असल्यानं नेहाच्या कुटुंबावर कोसळलेलं दु:ख समजू शकते,” अशी प्रतिक्रिया संशयित आरोपीच्या आईनं दिली.
भाजपाची काँग्रेस सरकारवर टीका : नेहाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे. “मी, नगरसेवक असूनही माझ्या कुटुंबाबाबत असं घडत असेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न समजतो,” असं त्यांनी म्हटलं. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. ज्या मुलीची हत्या झाली तिचे वडीलही काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपानं सिद्धरामय्या सरकारवर हल्लाबोल करत कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.
गृहमंत्र्यांनी मागितली माफी : शनिवारी सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, “सत्य कधीही लपवता येत नाही. काही लोकांना त्याबद्दल माहिती नाही. भाजपा या प्रकरणाचं राजकारण करत आहे. राज्यात कायदा, सुव्यावस्था राखण्याची आमची जबाबदारी असून तपास सुरू आहे. आम्ही अहवालाच्या आधारे माहिती दिली आहे. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. तरुणीनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानं ही घटना घडल्याचं वृत्त आहे. यात लव्ह जिहाद नाही. माझ्या वक्तव्यामुळं नेहाच्या आई-वडिलांना दु:ख झालं असेल, तर मी त्यांची माफी मागतो.”
गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा ABVP कडून निषेध : त्यावर भाजपा प्रणित अभाविप संघटनेनं आक्षेप घेत जोरदार निदर्शनं केलीत. गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध करत न्यायाची मागणी केली. त्यांनी काही वेळ घरासमोर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी परमेश्वर यांच्या निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 100 हून अधिक पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या घराजवळ दोन्ही बाजूंनी बॅरिकेड करून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.