‘लघु उद्योग भारती’ वर्धापन दिनानिमित्त ओमश्री अग्रो येथे रक्त-दंत-नेत्र तपासणी शिबीर
धुळे : लघु उद्योजकांसाठी कार्यरत, राष्ट्रीय पातळीवरची संघटना आणि धुळे औद्योगिक विश्वात क्रियाशील संघटना म्हणून ओळख असलेल्या ‘लघु उद्योग भारती’ या औद्योगिक संघटनेचा ३० वा वर्धापन दिन देशभरात ‘सेवा दिवस’ या रूपाने साजरा केला जातो. या निमित्ताने धुळे येथील अवधान व लळिंग औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कर्मचारी आणि मजूर यांच्यासाठी विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील औद्योगिक वसाहतीतील मे. ओमश्री अग्रो टेक लि. च्या आवारात करण्यात आले.
यांत प्रामुख्याने रक्त-दंत-नेत्र तपासण्या करण्यात आल्यात. धुळे इकाईतर्फे थायरोकेयर लॅबचे संजीव सिंग व डॉ. देवदत्त चव्हाण यांच्या सहकार्याने विविध रक्त तपासण्या, तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या अण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती दंत महाविद्यालय येथील डॉक्टरांच्या समूहातर्फे दंत तपासणी तसेच संदीप फाउंडेशनची शाखा असलेल्या शारदा नेत्रालय यांच्या समूहातर्फे डोळ्यांच्या विविध तपासण्या तर डॉ. बच्छाव व डॉ. गवळी यांच्यातर्फे रक्तदाब, छाती व फुफ्फुस विषयीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सदर तपासण्या व रोगनिदान तसेच समुपदेशन करण्यात आले. सदर शिबिरात अवधान व लळिंग औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमधील उद्योजक, कर्मचारी आणि मजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित जवळपास तीनशेपेक्षा अधिक मजुरांच्या आरोग्यविषयक तपासण्या मोफत करण्यात आल्या.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदार जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. उपस्थित मजुरांना मतदानाचे महत्व समजावत, त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत प्रबोधन करण्यात आले. तहसीलदार यांच्या कार्यालयातून आलेल्या समूहामार्फत पथनाट्य व पोवाडे यांच्या माध्यमांतून लक्षवेधक पद्धतीने मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीसाठी अभिनव पद्धतीच्या ‘सेल्फी पाॅइंट’ची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित मजुरांनी उत्स्फूर्तपणे ‘मै मतदाता – लोकतंत्र मजबूत बनाता’ अशा आशयाच्या सेल्फी पोइंटवर स्वत:चे फोटो काढून सामाजिक माध्यमांवर उत्साहाने प्रसिध्द केले. कार्यक्रम पश्चात अल्पोपहार व शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिध्द वास्तूविशारद आणि सामाजिक कार्यकर्ते रवी बेलपाठक, ओमश्री ग्रुपचे चेअरमन व कार्यकारी संचालक कैलास अग्रवाल, सनदी लेखापाल श्रीराम देशपांडे, भारतीय किसान संघाचे संयोजक साहेबचंद जैन, शारदा नेत्रालय व्यवस्थापन समिती प्रमुख दिपक मेहता, श्रीपाल मुणोत, लघु उद्योग भारतीचे सल्लागार राहूल कुलकर्णी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओमश्री समूहाचे संदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल, सचिन अग्रवाल, एसीपीएम दंत महाविद्यालयाच्या डॉ. गौरव माळी, शारदा नेत्रालयच्या डॉ. हिरल देसाई यांचे सहकार्य लाभले. लघु उद्योग भारतीच्या सर्व संचालक सदस्यांनी परिश्रम घेतले.