अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत लहानु साबळे धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
धुळे : बागलाण तालुक्यात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी कुठलाही विकास केला नसल्याचा आरोप करीत बागलाण तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहानु महादू साबळे यांनी सोमवारी धुळे लोकसभा निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
लहानु साबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बागलाण तालुक्यात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. मला शेतकऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असून, त्यामुळेच मी आज धुळे लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. यासाठी मतदार संघातील गावागावात माझ्या भेटीगाठी सुरू असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांकडून मला पाठिंबा मिळत असल्याची प्रतिक्रिया लहानु साबळे यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहानु साबळे हे अमरावतीपाडा ता. बागलाण येथील रहिवासी आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अमरावती पाडा गावाचे सरपंच नानाजी गातवे, शिवाजी जाधव, ज्ञानदेव गातवे, दत्ताराम गातवे, लक्ष्मण घोडे, भाऊसाहेब पानसरे, यशवंत गातवे, कोंडाजी पानसरे, संतोष गातवे, भगवान गातवे आदी उपस्थित होते.