महाविकास आघाडीतर्फे डॉ. शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धुळे : रणरणत्या उन्हातही तुमचा आनंद, उत्साह पाहिला. त्यामुळे आजचं वातावरण हे विजयाचं वातावरण आहे. धुळ्याची लेक असलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांनी नाशिकमध्ये कर्तृत्व गाजविले. नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उटवला आहे. अशा या कर्तृत्ववान लेकीला संधी द्या, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित जाहीर सभेत आमदार थोरात बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा त्यांना पाठिंबा असल्याचे राजेंद्र देसले यांनी जाहीर केले.
इंडिया व महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील अधिकृत उमेदवार शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 41 अंश सेल्सीअस तापमान असूनही या रॅलीत प्रंचंड उत्साह दिसून आला. संपुर्ण आग्रा रोड गर्दीने व्यापला होता. आदिवासी नृत्य, डिजेचा दणदणाट, ढोलताश्यांचा गजर आणी जोरदार घोषणाबाजीने निघालेल्या या रॅलीने धुळे दणाणून गेले. रॅलीत काँग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख उमेश पाटील यांच्यासह इंडीया आणि महाविकास आघाडीचे मातब्बर नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. धुळे ग्रामिणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात प्रचंड ऊन अंगावर झेलत महाविकास आघाडी समर्थक जनतेची रेकॉर्डब्रेक रॅली निघाली. या रॅलीचे रुपांतर जिजामाता शाळेजवळ सभेत झाले.
सभेला संबोधीत करताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, 43 अंशाच्या एव्हढ्या तापमानातही रॅलीत जमलेल्या सर्थकांचा उत्साह, आनंद आणि त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आपण भारावलो आहोत. आपल्या उमेदवार शोभाताई ह्या धुळ्याच्या लेक आहेत. त्यांचे शिक्षण धुळ्यातच झाले आहे. त्या मालेगावच्या सुनबाई आहेत. नाशिकमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला. दोन वेळा नगरसेवक, नाशिक महापालिकेच्या महापौर, आमदार, मंत्री अशी पदे भुषवीत त्यांनी विविध समाज घटकांना न्याय दिला आहे. नाशिकध्ये कर्तृत्व गाजविलेल्या या कर्तृत्ववान लेकीला धुळ्यात संधी द्या, असे आवाहन थोरात यांनी केले. राज्य सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. अंमली पदार्थ सापडतात. सरकारकारचा कारभार भोंगळपणे सुरु आहे. केंद्राकडूनही दमन सुरु आहे. निपुरची घटना सर्वांनाच माहित आहे. मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनही जेलमध्ये आहेत. सरकारकडून दडपशाही सुरु आहे. कापूस, सोयाबीन, कांदा या कृषी उत्पादनांना भाव नाही. शेतकर्यांचे हाल होत आहेत. केंद्र सरकार आपलं नाही, अशी शेतकर्यांची भावना झाली आहे. आताचं वातावरण हे विजयाचं वातावरण आहे. त्यामुळे 20 मे रोजी सर्वांनी मतदान करा, तुमचं मतदान हे राज्यघटना वाजविण्यासाठी आहे. कर्तृत्ववान लेकीला संधी देण्याासाठी आहे, असेही आमदार थोरात म्हणाले.
रॅलीत ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रॅलीत सहभागी प्रत्येकाच्या हातात काँग्रसेचा झेंडा, डोक्यावर रूमाल, टोपी दिसून आली. अनेक जण हाती घेतलेला काँग्रेसचा पंजा तसेच राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमा झळकवित होते. तर डिजेवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह देशभक्तीपर गिते लावण्यात आली होती. शोभा बच्छाव यांच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. याबरोबच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे रॅलीत आदिवासी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तप्त उन्हातही रॅलीत प्रचंड उत्साह दिसून आला. सभा संपल्यावर डॉ. शोभा बच्छाव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. रॅलीत काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, युवराज करनकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेना जिल्हा प्रमुख अतूल सोनवणे, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महेश मिस्त्री, डॉ. सुशिल महाजन, हेमंत साळुंखे, हिलाल माळी, कैलास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र पवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी, रिपाई अध्यक्ष सुरेश बैसाणे यांच्यासह धुळे व नाशिक जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सपा, रिपाइं (गवई गट), आम आदमी पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जन्मभूमिचा विकास करण्याची संधी द्या : महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव यांनी सभेला संबोधीत केले. श्रीमती बच्छाव म्हणाल्या, इंडिया आघाडीने मला मोठी जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या विश्वासावर ही जबाबदारी मी घेतली आहे. यावेळची लोकसभा निवडणूक देशासाठी, आपल्या भवितव्यासाठी महत्वाची आहे. नवी कलाटणी
देणारी ही निवडणूक आहे. सध्या दडपशाहीचे वातावरण आहे. त्यामुळे मतदानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून द्या. भाजप सरकारच्या काळात शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. कृषी अवजारांपासून ते खतं, कृषी उत्पादनांवर 18 टक्के जीएसटी लावून केंद्राने शेतकर्यांना पिळले आहे. शेतकर्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. नाशिक ही माझी कर्मभूमी राहिली आहे. कर्मभूमीचा मी विकास केला आहे. आता जन्मभूमीचा विकास करण्यासाठी मला संधी द्या, असे भावनिक आवाहन शोभा बच्छाव यांनी केले.
काम करणारा उमेदवार काँग्रेसने दिला : सभेला संबोधीत करताना धुळे ग्रामिणचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांना आशिर्वाद देण्यासाठी सटाणा-बागलाणपासून धुळे लोकसभेतील सर्वच मतदार संघातील जनता आली आहे. मी, आज भाषण करण्यासाठी नव्हे तर तुमचे आभार मानण्यासाठी उभा आहे. शोभाताईंना काँग्रेस महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्यासोबत शिंदखेडा मतदार संघात होतो. त्यावेळी शोभाताई ज्यांना भेटल्या ते सर्वच जण म्हणाले की, ताईंनी पालकमंत्री असताना आमचे काम करुन दिले होते. त्यामुळे काम करुन देणारा योग्य उमेदवार काँग्रेसने दिला. धुळे लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदार संघात आपल्याला शोभाताईंना लिड मिळवून द्यायचा आहे. प्रचंड ऊन असतानाही निघालेल्या मोठ्या रॅलीने आपला विजय निश्चित केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने 22 उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले तर आपल्या केंद्रातील सरकारने शेतकर्यांचे 72 हजार कोटी रुपये माफ केले होते. आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर सर्वच महिलांना आपण लखपती करणार आहोत. विरोधकांच्या रॅलीमध्ये शेर, वाघ अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. परंतु मतदानाच्या दिवशी मी स्वत: बघणार आहे. शेर कोण आणि वाघ कोण असा चिमटा आमदार कुणाल पाटील यांनी घोषणा देणार्यांना काढला.
हेही वाचा