नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पक्षानेही दाखल केला उमेदवारी अर्ज
धुळे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाने धुळे लोकसभेसाठी शिवाजी नाटू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांनी गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे चिन्ह सिंह असल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. अंकुश नवले, युवा आघाडीचे प्रदेश महासचिव डॉ. भूषण पोतदार, ओबीसी एनटी पार्टीचे रामभाऊ हाके, ॲड. मनोहर थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी दाखल केले सहा नामनिर्देशन पत्र : धुळे लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. त्यात भरत बाबुराव जाधव, अपक्ष यांनी एक अर्ज, पाटील शिवाजी नथ्थु , ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष यांनी एक अर्ज, शेख मोहम्मद जैद शमीम अहमद, वेल्फेअर पार्टी ऑॅफ इंडिया पक्ष यांनी एक, मुकिमुद्दीन शेख, भीमसेना यांनी एक अर्ज, सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर अपक्ष यांनी एक अर्ज तसेच संजय रामेश्वर शर्मा अपक्ष यांनी एक अर्ज असे एकूण सहा उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले.
हेही वाचा