महिलांना दरवर्षी एक लाख, 30 लाख नोकऱ्या आणि बेरोजगारांना दरमहा साडेआठ हजार भत्ता
धुळे : काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देणार, शासकीय सेवेतून 30 लाख पदे भरणार, बेरोजगारांना दरमहा 8 हजार 500 रुपये भत्ता देणार, लष्करातील अग्निविर योजना रद्द करुन जवानांना कायम नोकरी दिली जाईल. सावित्रीबाई छात्रालयाच्या माध्यातून महिलांना मोफत राहण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी याआधीच दिले असल्याची आठवण काॅंग्रेसच्या महाराष्ट्र मीडिया प्रभारी प्रगती अहिर यांनी करून दिली. आम्ही एएसपीसाठी म्हणजेच किमान आधारभुत किंमतीसाठी कायदा बनविणार. शेतीमाल, अवजारे आणि खतांवरील जीएसटी रद्द करणार. शेतकर्यांच्या कृषीमालाला भाव दिला जाईल.
कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षाच्या नेत्याने तीन हजारांहुन अधिक महिलांचा लैंगीक छळ केला आहे. या वादग्रस्त नेत्याच्या प्रचारसभेत “या नेत्याला मत म्हणजेच मोदींना मत”, असे पंतप्रधान सांगतात. याचा अर्थ काय घ्यायचा? भाजप बलात्कार्यांचा पक्ष आहे का?, अशी विचारणा करत काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या मीडिया प्रभारी प्रगती अहिर यांनी भाजपला केली. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून गुन्हेगार आणि बलात्कारी नेत्यांना उमेदवारी दिली गेली होती, असेही त्या म्हणाल्या.
धुळे शहरातील काँग्रेस भवनात गुरूवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. प्रगती अहिर म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष जुमलेबाज नाही. आम्ही जुमला दिला नसून, न्यायपत्र दिले आहे. न्यायपत्रातून जनतेला ते पूर्ण करण्याची गॅरंटी दिली आहे. निवडणुकीत आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करतो. कर्नाटक आणि राजस्थान राज्यातील काॅंग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पाळली आहेत. काँग्रेसच्या न्यायपत्रात जाती-धर्माचा नव्हे तर विकासाचा आणि न्यायाचा उल्लेख आहे. धर्माच्या नावावर राजकारण कोण करतो हे सर्वांनाच माहित आहे. शेतकर्यांचे उत्पन्न भाजपने दुप्पट केलेले नाही.
पंतप्रधान मोदी हे मन की बात करतात. जनतेची बात ऐकतच नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने शेतकर्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली. महिला न्यायाची भुमिका मांडताना मणिपूर आणि रेवन्ना प्रकरणामध्ये अहिर यांनी भाजपला सुनावले. प्रियंका गांधी, राहुल गांधी हे विदेशात गेले तर भाजपला लगेच कळते.मात्र बलात्काराचा आरोपी रेवन्ना विदेशात गेला तरी भाजपला कळले कसे नाही, असा बोचरा सवालही त्यांनी केला. 2014 पासुन जातीनिहाय जनगणणा झाली नाही. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसींसह वंचीत घटकांना न्याय मिळत नाही. 400 पारचा भाजपचा नारा ही जुमलेबाजी आहे. मागील निवडणुकीत पुलवामामुळे भाजपला 303 खासदार निवडून आणता आले. यावेळी भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. आम्ही रामाच्या नावाने मते मागत नाही. राम आम्हालाही पुजनिय आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर काँग्रेस राम मंदिरात दर्शनासाठी जाईल असेही अहिर म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, साबीर खान, अॅड. सुधीर जाधव, अलोक रघुवंशी, राजेंद्र खैरनार, विलास पाटील आदी उपस्थित होते.