शिक्षक मतदारसंघासाठी 12 मेपर्यंत नावनोंदणी करता येणार
धुळे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार, 10 जून, 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना बुधवार, 15 मे, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक बुधवार, 22 मे, 2024 राहील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी होईल. सोमवार, 27 मे, 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. सोमवार, 10 जून, 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल, तर 13 जून, 2024 रोजी मतमोजणी होईल. मंगळवार, 18 जून, 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी नावनोंदणी केलेले शिक्षक मतदार मतदान करण्यास पात्र राहतील.
या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यात 8 हजार 131 शिक्षक मतदार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदर पर्यंत म्हणजेच 12 मे, 2024 पर्यंत करता येईल. तरी शिक्षकांनी शेवटच्या दिवसांपर्यंत मतदार नोंदणीसाठी वाट न बघता तात्काळ मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही श्री. गोयल यांनी केले आहे.
मतदार यादीनिहाय भागाचे नाव व एकूण मतदार संख्या (कंसात मतदार संख्या) -* साक्री- पुरुष 717 स्त्री 151, पिंपळनेर पुरुष 564, स्त्री 132, दोंडाईचा पुरुष 383, स्त्री 159, शिंदखेडा पुरुष 507 स्त्री 106, शिरपूर पुरुष 1417, स्त्री 495, धुळे ग्रामीण पुरुष 1341, स्त्री 269, धुळे शहर पुरुष 1273, स्त्री 617 असे एकूण 8 हजार 131 मतदार आहेत. तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले.
मतदार नोंदणीसाठी सूचना : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि 1 नोव्हेंबर, 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी सुधारीत अर्ज क्रमांक 19 भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जात नाही.