संविधान वाचविण्याची ताकद बहुजन समाज पार्टीतच : जहूर युसुफ
धुळे : काँग्रेस हा आमच्यासाठी सापनाथ तर भाजपा नागनाथ आहे. हे दोघेही विषारी साप असून दोघांमुळे देशातील जनता त्रासलेली असल्याचे सांगत गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. या विरोधात व देशात शांतता, समानता आणि मानवतेचा विचार टिकविण्यासह संविधान वाचविण्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती आज बहुजन समाज पार्टीचे धुळे लोकसभेचे उमदेवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साक्री रोडवरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपली भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, गेली अनेक वर्ष काँग्रेसने या देशात राज्य केले. त्यांनी देखील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. तर गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदींनी तर संपुर्ण देशच विकायला काढलेला आहे. म्हणून आमच्यासाठी काँग्रेस सापनाथ तर भारतीय जनता पार्टी नागनाथ आहे. हे दोघेही विषारी आहेत. यां दोघांनी देशातील जनतेला त्रासलेले आहे. या दोघांना आम्ही समान शत्रू मानून आमची उमेदवारी आम्ही केलेली आहे. आंबेडकरवादी लोकशाहीला मानणार्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कष्टकरी बहुजन समाजाने एकत्र येवून बसपाला मतदान करून मोठ्या संख्येने निवडून द्यावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
धुळे लोकसभेमध्ये पाण्याचा प्रश्न असून जिल्ह्याला तापीचे वाहून जाणारे पाणी थांबून त्याला इतर भागांमध्ये वळवण्याचं काम आम्ही करणार आहोत. याबरोबर धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ निर्माण करणे, प्रत्येक गाव खेड्यामध्ये रस्ता, पाणी, वीजेचा प्रश्न सोडवून भ्रष्टाचार मुक्त शासन निर्माण करण्यासह बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी एमआयडीसीचा विस्तार केला जाईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देण्यासाठी काम करणार असल्याचेही उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ यांनी यावेळी सांगितले.
या पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाणे, माजी प्रदेश सचिव रमेश निकम, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कांबळे, जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाठ, जिल्हा सचिव विजय भामरे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष अॅड. सतीश अहिरे, धुळे शहर विधानसभा महासचिव अॅड.कृष्णा निमघडे, राजेश खैरनार, सागर भामरे, अॅड. मिलिंद बाविस्कर, दादाजी साळवे, ईश्वर साळवे, भाऊसाहेब पवार, आसाराम थोरात, अली हसन अश्पाक सितारा, असिफ खान खालिद सरहदि, सोहेल अहमद आदी उपस्थित होते.