शोभाताई बच्छाव भाजपमध्ये जाणार नाहीत? कुणालबाबांची गॅरंटी
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत, याची गॅरंटी काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी घेतली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्याची रणधुमाळी सध्या सुरू आहे. 20 तारखेला मतदान तर चार जूनला एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत गुवाहाटी प्रकरणाची चर्चाही जोरात आहे. आपण ज्या उमेदवारांना विश्वासाने निवडून देतो, ते उमेदवार उद्या कोणत्या पक्षात जातील याची शास्वती नसल्याचा बोलबाला मतदारांमध्ये आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवार डावलून काँग्रेस पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव (नाशिक) यांना उमेदवारी दिली. बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना पक्षातूनच विरोध झाला आणि पक्षामध्ये राजीनामा सत्रदेखील सुरू झाले. काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत समीर यांची मनधरणी करण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना डॉ. तुषार शेवाळे यांनी जोरदार झटका दिला. डॉ. शेवाळे यांच्या भाजप प्रवेशामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी प्रतिकूल असलेल्या या वातावरणातच गुवाहाटीच्या घटनेवर धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये चर्चा रंगत आहेत. सत्तापिपासू राजकारण्यांचे वाभाडे काढले जात आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या पुढार्यांमुळे सामान्य जनता आणि मतदार देखील नाराज असल्याचे चित्र आहे. दहा वर्षांच्या सत्ताकाळात जनतेच्या पदरात निराशा टाकणाऱ्या भाजपच्या विरोधात जनमत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या पाठीशी जनता जनार्दनाचा कौल जाऊ शकतो असे अनुकूल वातावरण असले तरी काँग्रेस पक्षाला सत्तेवर बसवायचे म्हणून एखाद्या उमेदवाराला मतदान केले. परंतु तो निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षातच राहील याची काय गॅरंटी? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर डॉ. शोभाताई बच्छाव निवडून आल्या तरी त्या भाजपमध्ये जाणार नाहीत याची काय गॅरंटी? अशी प्रश्नार्थक चर्चा धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. याच चर्चेचा धागा पकडून याबाबत आमदार कुणाल पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, डॉ. शोभाताई बच्छाव या सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस पक्षात त्यांनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असल्याने त्या पक्ष सोडून जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी मंगळवारी सकाळी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या सभागृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि पक्षाचा जाहीरनामा सादर केला. डॉ. शोभाताई बच्छाव लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गुवाहाटीसारखा प्रकार पुन्हा एकदा घडला तर त्या भाजपमध्ये जाणार नाहीत याची काय गॅरंटी? असा प्रश्न आमदार कुणाल पाटील यांना विचारण्यात आला होता.
हेही वाचा