मोदी सरकार आणि डॉ. सुभाष भामरेंनी काय दिवे लावले? पुरोगामी संघटनांचा काॅंग्रेसला पाठिंबा
धुळे : भाजप आणि मोदी यांनी देश चालविताना केलेला कारभार देशाला विनाशाकडे नेणारा आहे. चारशे पारचा नारा देऊन संविधान बदलविण्याचा घाट घातला जात आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार आले तर संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल, अशी भीती बुद्धिजीवी लोकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून खासदार असलेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी देखील आश्वासने देण्याऐवजी काहीच केले नाही. आजही त्यांचा प्रचार जात आणि धर्म या मुद्द्यांवरच सुरू आहे. त्यामुळे देशात आणि धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. देशात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी सर्व पुरोगामी संघटना काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा देत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह बुद्धिजीवी लोकांनी जाहीर केले.
धुळे जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटना, संस्था, गट यांनी बुधवारी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भावनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा जाहीर केला.
पुरोगामी संघटनांच्या विविध बुद्धिजीवी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात भारतातील लोकशाही व भारताची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आली आहे. त्यामुळे मोदी व त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा या लोकसभा निवडणूकीत पूर्णपणे पराभव झाला पाहिजे. विकसीत व विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीयांचे दरडोई उत्पन्न फारच कमी झाले असून, मोदी सरकारने कष्टकरी, शेतकरी, कंत्राटी कामगार, रोजंदारी कामगार यांच्या श्रमावर सत्ताधारी वर्गाला मोठी संपत्ती जमा करण्यास मदत केली आहे. ज्यामुळे भाजपचे मित्र अंबानी-अदानी यांना मदत झाली आहे. मोदिंच्या कार्यकाळात म्हणजे दहा वर्षांत देशात महिलांवर, दलितांवर, अल्पसंख्यांक व आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक, व्यापारी अडचणीत आले असून, जीएसटीची कमाई ही बलाढ्य श्रीमंतांकडे वळवण्यात आली आहे.
२०१४ व २०१९ च्या निवडणुकीमध्ये लोकांनी भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेला भुलून मतदान केले होते. जनतेला अपेक्षा होती की, सर्वांच्या सोबत सर्वांचा विकास होईल. आपल्या या घोषणेला अनुसरून मोदींनी २०१४ मध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची गॅरंटी दिली होती. मात्र त्या प्रमाणात तरूणांना नोकऱ्या दिल्या नाहीत. भारतात शेतकरीविरोधी व कामगार विरोधी कायद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास भाजपा सरकार जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
गेल्या दहा वर्षात भारतात दंगली, दडपशाही व शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्यामुळे भाजप सरकार सत्तेतून हद्दपार करणे आवश्यक आहे. त्यासाठीच पाठिंबा जाहीर करत आहोत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टीसचे डॉ. जालिंदर अडसुळे, न्यायमूर्ती जे. टी. देसले, गो. पि. लांडगे, सीटूचे कॉ. एल. आर. राव, जमिअत-ए-इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष असिम शेख, सचिव शोएब मिर्झा, आबिद शेख, इसहाक शेख, नगरराज समर्थन मंचाचे रामदास जगताप, नामदेवराव येवले, प्रा. मोहन मोरे, भारत जोडो अभियानाचे जिल्हा समन्वयक विशाल वानखेडे, शहाजी शिंदे, नितीन बागूल, मोहन मोरे, कॉ. पोपटराव चौधरी, बी. ए. पाटील, डॉ. जगदीश पाखरे, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, रचना अडसुळे, विशाल महाले, प्रा. शरद पाटील, रणजित शिंदे, आनंद जावडेकर, विशाल वानखेडे, हेमंत भडक, डॉ. मनोज राका, डॉ. संतोष सदावर्ते, श्रीकृष्ण बेडसे, ॲड. विशाल साळवे, ईकबाल शेख, इरफान शेख, अफसाना, नईम शेख, डॉ. प्रसेनजित बैसाणे, प्रभाकर सूर्यवंशी, ईश्वर मोहिते, डॉ. कृष्णा मोरे आदी व्यक्तींनी, संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहीती यावेळी देण्यात आली.
भारत देश २०१४ नंतर पुर्णतः बदललेला आहे. जागतिक बॅंकेच्या दारात कायम कर्जा साठी लायनीत उभा राहणारा भारत आज जगातील समृध्द बलशाली राष्टांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. २०१४ नंतर भारतात सतत होणार्या आतंकवादी घटना, दंगली कायम स्वरुपी बंद झाल्या आहेत. भारत देशाचा सर्व क्षेत्रात चौफेर विकास सुरु आहे. भारत देश समृध्द होत आहे.
देशाच्या सुज्ञ जनतेला हे सारं दिसत असल्यामुळे भारतीय जनता पुन्हा मोदी सरकारला प्रचंढ बहुमताने निवडून देणार आहे.
तेव्हा आज मोदींना विरोध करणारे त्या विजयी मिरवणूकीत सर्वात पुढे नाचतांना दिसतील.
जय हो नमो नमो.